Mahabreaking

[breaking_news]

Card swapped: एटीएममध्ये कार्डची अदलाबदल; ७१ वर्षीय वृद्धाच्या खात्यातून १.२९ लाख लंपास

Card swapped: येथील टी.के.व्ही. चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ७१ वर्षीय वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख २९ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पातूर पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Card swapped

  पातूरमध्ये एटीएम ठगांचा डाव; वृद्धाचे कार्ड बदलून खात्यावर डल्ला

राहुल सोनोने 

पातूर : येथील टी.के.व्ही. चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ७१ वर्षीय वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख २९ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पातूर पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोणेनगर, खानापूर रोड, पातूर येथील विजय भिकाजी गेंदे हे २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास टी.के.व्ही. चौकातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागून तीन अनोळखी व्यक्ती एटीएममध्ये आल्या. या व्यक्तींनी चलाखीने गेंदे यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांचे कार्ड स्वतःकडे ठेवले आणि त्याऐवजी दुसरे कार्ड त्यांच्या हातात दिल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने मोबाइल क्रमांकावरून गेंदे यांच्याशी संपर्क साधला. आपण सोलार कंपनीतून बोलत असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडे ओटीपीची मागणी केली. मात्र, कोणताही ओटीपी प्राप्त झाला नसल्याचे गेंदे यांच्या लक्षात आले. त्यानंतरही संबंधित मोबाइल क्रमांकावरून तीन वेळा फोन आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

यानंतर गेंदे यांनी मोबाइलवरील बँक व्यवहारांचे संदेश तपासले असता, त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १ लाख २९ हजार रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ बँक शाखेत जाऊन एटीएम कार्ड ब्लॉक केले. त्यांच्या खात्यात केवळ ४ हजार रुपये शिल्लक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी विजय गेंदे यांच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय दत्तात्रय चव्हाण करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top