Burning Bus Drama :बाळापूर–शेगाव मार्गावर बुधवारी (२० मे) सकाळी साडेसातच्या सुमारास खासगी लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. काही क्षणांतच आग भडकून संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुचाकीस्वार गंभीर जखमी; सुदैवाने टळली मोठी जीवितहानी
जाकीर अहमद
बाळापूर : बाळापूर–शेगाव मार्गावर बुधवारी (२० मे) सकाळी साडेसातच्या सुमारास खासगी लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. काही क्षणांतच आग भडकून संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, स्वस्तिक ट्रव्हल्सची इंदौरहून अकोल्याकडे येणारी लक्झरी बस (क्रमांक एमपी ०९ पीए ०२७१) बाळापूरपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असताना एका दुचाकीला धडकली. धडकेनंतर बसचा टायर फुटल्याने स्पार्किंग झाली आणि त्यातून बसने पेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
आग लागल्यानंतर काही क्षणांतच बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालक व स्थानिकांच्या तत्परतेमुळे प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आगीने संपूर्ण बसला वेढा घातल्याने वाहन पूर्णतः जळून खाक झाले.या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे नेमके कारण आणि अपघाताचा तपास सुरू आहे. दरम्यान, चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

