Mahabreaking

[breaking_news]

Teachers Constituency election: शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलढाणा प्रशासन सज्ज; ९,१२४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Teachers’ Constituency election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, तब्बल ९ हजार १२४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले असून, मतदान पथके संबंधित केंद्रांकडे रवाना झाली आहेत.

Teachers

 शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीला मतदानाचा कौल; बुलढाण्यात १८ केंद्रांवर आज मतदान

बुलढाणा  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, तब्बल ९ हजार १२४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले असून, मतदान पथके संबंधित केंद्रांकडे रवाना झाली आहेत.

शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, मतदानाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ओळख पटविण्यासाठी दहा पर्यायी कागदपत्रांना मान्यता

मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना ओळखपत्रासंदर्भात अडचण येऊ नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाने दहा पर्यायी कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले आहेत. २१ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

मतदार ओळखपत्र सादर करू न शकणाऱ्या मतदारांना ओळख पटविण्यासाठी पुढील कागदपत्रांपैकी पर्यायी पुरावा सादर करता येईल.

१. आधार कार्ड

२. वाहनचालक परवाना

३. पॅन कार्ड

४. भारतीय पासपोर्ट

५. केंद्र किंवा राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा संबंधित खाजगी औद्योगिक संस्थेने कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र

६. खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

७. संबंधित शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघातील मतदार कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेने जारी केलेले सेवा ओळखपत्र

८. विद्यापीठाने वितरित केलेले मूळ पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र

९. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र

१०. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड (UDID)

शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तिक रजा

मतदानाची टक्केवारी वाढावी आणि पात्र मतदारांना मतदान करता यावे, यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू नसल्याने, त्यांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेवर नजर

निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवरील कामकाजाचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवणे आणि आवश्यकतेनुसार नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी निर्धारित वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top