arrested red-handed : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली. सचिन शत्रुघ्न इंगळे (वय ३३), पद – कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता, पंचायत समिती मोताळा, रा. उमरा ता. खामगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे घरकुल लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता गजाआड : बुलढाणा एसीबीची धडक कारवाई
बुलढाणा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मोताळा पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली. सचिन शत्रुघ्न इंगळे (वय ३३), पद – कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता, पंचायत समिती मोताळा, रा. उमरा ता. खामगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे घरकुल लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मोताळा तालुक्यातील एका लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्पसंख्याक घटकातून घरकुल मंजूर झाले आहे. या घरकुलाचा दुसरा हप्ता ७० हजार रुपये प्रलंबित होता. हा हप्ता मंजूर करून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोपी इंगळे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती.
तक्रारीची पडताळणी १५ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारण्यास आरोपीने संमती दिली. यानुसार पिंपळगाव राजा ते मोताळा रोडवरील फुली फाटा येथे एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सचिन इंगळे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार तसेच सापळा पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा येथे दूरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८, व्हॉट्सअॅप ९४०५०९१०६४ किंवा टोल फ्री १०६४ वर तक्रार करावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी केले आहे.

