Mahabreaking

[breaking_news]

Bovine animals :कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांना पडक्या दुकानात डांबले; बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई, तीन बैल ताब्यात

Bovine animals :कसाबपुरा, बोरगाव मंजू येथील नाल्यालगत असलेल्या पडक्या मटन मार्केटमधील दुकानात कत्तलीच्या उद्देशाने तीन गोवंश बैलांना आखूड दोरीने बांधून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता डांबून ठेवल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिन्ही बैलांना पंचनामा करून ताब्यात घेतले असून, त्यांची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

Bovine animals
नाल्याकाठच्या पडक्या मटन मार्केटमध्ये निर्दयतेचा प्रकार; तीन गोवंश बैलांची सुटका

बोरगाव मंजू :  येथील नाल्यालगत असलेल्या पडक्या मटन मार्केटमधील दुकानात कत्तलीच्या उद्देशाने तीन गोवंश बैलांना आखूड दोरीने बांधून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता डांबून ठेवल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिन्ही बैलांना पंचनामा करून ताब्यात घेतले असून, त्यांची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी शहजाद शेख दस्तगीर उर्फ लड्डू, रा. कसाबपुरा, बोरगाव मंजू, याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.०८ वाजता पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी अभिजीत असलमोल, करण चव्हाण आणि सोनटक्के हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,  नाल्याकाठी असलेल्या पडक्या मटन मार्केटमधील दुकानात काही गोवंश बैलांना कत्तलीच्या उद्देशाने कोंबून ठेवण्यात आले आहे. ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली.
कारवाईसाठी दोन पंचांना बोलावून त्यांना मिळालेल्या माहितीची कल्पना देण्यात आली. पंचांनी सोबत येण्यास होकार दिल्यानंतर पोलिस पथक आणि पंच खासगी वाहनाने संबंधित ठिकाणी दाखल झाले.

पडक्या दुकानात तीन बैल आढळले

पोलिस पथकाने  नाल्यालगत असलेल्या पडक्या मटन मार्केटची पाहणी केली. या ठिकाणी शटर असलेली एकूण पाच दुकाने असल्याचे आढळून आले. त्यापैकी मध्यभागी असलेल्या तिसऱ्या दुकानाचे शटर उचलून पाहणी केली असता, आत तीन गोवंश बैल बांधून ठेवल्याचे आढळले.
तक्रारीनुसार, बैलांना आखूड दोरीने घट्ट बांधण्यात आले होते. तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून तिन्ही बैलांना ताब्यात घेतले.

आरोपीचा शोध; कायदेशीर कारवाई

पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला आरोपी शहजाद शेख दस्तगीर उर्फ लड्डू याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. बैलांना निर्दयतेने बांधून कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचा आरोप करत त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे यांनी कायदेशीर फिर्याद दिली.
या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित १९९५) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९६० अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top