Battered by Stormy Winds :तालुक्यात १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक भागांत घरांवरील टिनपत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला, तर केळी, भाजीपाला व लिंबू पिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावेत आणि शासनाकडून त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.

बाळापूर तालुक्यात वादळाचे थैमान; केळी उत्पादक शेतकरी संकटात
जाकीर अहमद
बाळापूर : तालुक्यात १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक भागांत घरांवरील टिनपत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला, तर केळी, भाजीपाला व लिंबू पिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावेत आणि शासनाकडून त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
माहितीनुसार, १ जून रोजी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन काही वेळातच जोरदार वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यातील निंबा फाटा परिसर, तामसी, पिंपळगाव, चिंचोली गणू तसेच इतर गावांमध्ये वादळी वाऱ्याचा मोठा प्रभाव जाणवला. अनेक घरांवरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले.
जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यालगतची अनेक झाडे उन्मळून पडल्याने काही भागांत वाहतूक विस्कळीत झाली. तसेच बाळापूर शहरातील एका विद्युत रोहीत्राजवळ झाड कोसळल्याने वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून काही भागांतील वीजपुरवठा अनेक तास खंडित राहिला. परिणामी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
दरम्यान, वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून भाजीपाला, लिंबू आणि विशेषतः केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या केळी बागांमध्ये झाडे कोलमडून पडल्याने हाती येणारे उत्पन्न धोक्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानाच झालेल्या या नुकसानीमुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
‘चार एकर केळी बागेचे मोठे नुकसान’
“माझा चार एकर केळीचा बगीचा असून पीक हाती येण्यासाठी काहीच कालावधी बाकी होता. मात्र अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत द्यावी,” अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकरी कार्तिक आखरे (रा. बटवाडी बु., ता. बाळापूर) यांनी व्यक्त केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिकांना मदत जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

