Balasaheb : मराठवाड्यातील लातूर भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी साखरखेर्डा येथे आलेल्या आणि आपल्या कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बाळासाहेब उर्फ सखाराम कृष्णाजी पवार यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली आहे.

कष्टातून उभे केले साम्राज्य; साखरखेर्ड्याचे बाळासाहेब पवार काळाच्या पडद्याआड
साखरखेर्डा: मराठवाड्यातील लातूर भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी साखरखेर्डा येथे आलेल्या आणि आपल्या कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बाळासाहेब उर्फ सखाराम कृष्णाजी पवार यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने साखरखेर्डा परिसरात शोककळा पसरली आहे.
बाळासाहेब पवार म्हटले की, धिप्पाड देहयष्टीचे आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. कृष्णाजी पवार कामाच्या शोधात साखरखेर्डा येथे आले आणि पुढे याच गावाला आपले कर्मभूमी मानून ते स्थानिक झाले. सर्वांशी मिळून-मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे त्यांनी गावात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
बाळासाहेब पवार यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात एसटी बससेवा सुरू होण्यापूर्वी खासगी बसचे एजंट म्हणून केली. त्यानंतर भुसार मालाची खरेदी-विक्री करण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. पुढे या व्यवसायाचा विस्तार करत त्यांनी ‘पवार ट्रान्सपोर्ट’ कंपनी उभी केली. साखरखेर्डा परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल खामगाव व जालना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नेऊन विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. या व्यवसायातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारत गेली.
हळूहळू स्वतःचे ट्रक खरेदी करून शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याच्या व्यवसायाला त्यांनी मोठ्या प्रमाणात चालना दिली. साखरखेर्डा येथे मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत उपबाजार समिती स्थापन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अडतदार व व्यापारी म्हणून शेतमालाची खरेदी-विक्री सुरू केली. व्यवसायाशी घट्ट नाळ जोडल्याने त्यांनी एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून आपली ओळख निर्माण केली.
मात्र, जीवनात आलेल्या अनेक संकटांनी त्यांची कठोर परीक्षा घेतली. दोन मुलींचे निधन झाले. लव्हाळा ते साखरखेर्डा मार्गावर झालेल्या अपघातात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीचेही निधन झाले. भाऊ-बहीणही काळाच्या पडद्याआड गेले. एकापाठोपाठ एक दुःखाचे आघात सहन करूनही त्यांनी कधीही हिंमत हरली नाही. उरलेल्या मुलगा, मुलगी आणि नातवाचा संसार उभा करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. येणाऱ्या प्रत्येक संकटाचा त्यांनी धैर्याने सामना केला.
वयोमानानुसार शनिवारी, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण साखरखेर्डा गावावर शोककळा पसरली.
शनिवारी दुपारी ३ वाजता साखरखेर्डा येथील हिंदू स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी बाळासाहेब पवार यांच्या जीवनप्रवासाचा आणि कार्याचा संपूर्ण इतिहास उलगडून सांगितला.
यावेळी शिवसेना नेते, माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राजेंद्र काटे, सुधीर बेंदाडे, बाळासाहेब बेंदाडे, बबनराव लोढे, दामोदर लांबाडे, व्ही. के. जगताप यांच्यासह गावातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून बाळासाहेब पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गौरव जगताप यांनीही बाळासाहेब पवार यांनी केलेल्या कार्याची माहिती विषद करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बाळासाहेब पवार यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

