Aspirants’ dreams shattered: गेल्या दीड वर्षांपासून नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. कारण काल मंत्रालयात झालेल्या नगरपालिका अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत देऊळगाव राजा नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) वर्गासाठी राखीव निघाले. यामुळे आतापर्यंत “आपलाच नगराध्यक्ष निवडून आणू” असा विश्वास ठेवणाऱ्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह इच्छुकांच्या राजकीय गणिताचा फोल झाला असून शहरात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

देऊळगाव राजात राजकीय पक्षांची उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू
गजानन तिडके
देऊळगाव राजा : गेल्या दीड वर्षांपासून नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. कारण काल मंत्रालयात झालेल्या नगरपालिका अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत देऊळगाव राजा नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) वर्गासाठी राखीव निघाले. यामुळे आतापर्यंत “आपलाच नगराध्यक्ष निवडून आणू” असा विश्वास ठेवणाऱ्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह इच्छुकांच्या राजकीय गणिताचा फोल झाला असून शहरात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपासून देऊळगाव राजा नगरपालिकेवर प्रशासक राज आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी या काळात विविध प्रभागांमध्ये अनेक विकासकामे पूर्ण केली. शहरवासीयांच्या मते, नगरपालिका स्थापन झाल्यापासून एवढे काम एका प्रशासकाकडून झाले नव्हते. प्रशासकांनी कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण घालून दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
मागील कार्यकाळातील नगराध्यक्ष आणि राजकीय चित्र
सन २०१६ मध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक झाली होती. त्या वेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव होते. त्या आरक्षणातून भाजपाच्या सौ. सुनीता शिंदे या निवडून आल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात काही विकास उपक्रम राबविण्यात आले, परंतु नगरसेवकांच्या आंतरकलहामुळे पालिकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि अखेर प्रशासनाने हस्तक्षेप करून पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला.
आरक्षण बदलामुळे इच्छुकांचे समीकरण कोलमडले
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून नगराध्यक्षपदासाठी तयारी करणारे अनेक दिग्गज इच्छुक आता “स्वतःचा वार्ड शोधण्याशिवाय पर्याय नाही” अशा मनःस्थितीत आहेत. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव ठरल्यानंतर राजकीय पक्षांची मात्र भांबेरी उडाली आहे. प्रत्येक पक्ष सक्षम, सामाजिकदृष्ट्या मान्यताप्राप्त आणि कार्यक्षम महिला उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे.
स्थानिक राजकीय सूत्रांनुसार, काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षांकडून नव्या समीकरणांची चाचपणी सुरू आहे.
एक प्रभाग वाढला – सदस्यसंख्या १८ वरून २१
सन २०१६ मध्ये देऊळगाव राजा नगरपालिकेत एकूण ९ प्रभाग आणि १८ नगरसेवक होते. आता एक प्रभाग वाढून १० प्रभाग झाले असून मतदारसंख्येनुसार तीन सदस्यांची भर पडली आहे. त्यामुळे नवीन सदस्यसंख्या २१ इतकी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर इच्छुक आता “नगराध्यक्षपद नसेल तर सदस्यपद मिळवूया” या भूमिकेत असून चौकाचौकात त्याच चर्चांना उधाण आले आहे.
नव्या समीकरणांकडे लक्ष
नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता प्रभागनिहाय आरक्षण आणि प्रारूप मतदार याद्या जाहीर होणार आहेत. यानंतर प्रत्येक पक्ष आपली रणनीती ठरवेल.राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत अनुसूचित जाती महिला वर्गातील उमेदवारांची निवड ही सर्वात मोठी राजकीय कोडी ठरणार आहेत.

