road safety awareness : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी अकोला येथील बसस्थानकाला अकस्मिक भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाद्वारे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती तसेच ऑटोचालकांना मराठी भाषेच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी जाणून घेतली.

‘रोड सेफ्टी व्हिजन’ व्हॅनची मंत्री सरनाईकांकडून पाहणी; मराठी प्रशिक्षण व जनजागृती वाढविण्याच्या सूचना
आगाखान पठाण
अकोला : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी अकोला येथील बसस्थानकाला अकस्मिक भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाद्वारे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती तसेच ऑटोचालकांना मराठी भाषेच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी जाणून घेतली.
भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाची सविस्तर माहिती घेतली. महाराष्ट्रात सध्या केवळ अकोला जिल्ह्यात अशा प्रकारे विशेष वाहनाद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, अकोला विभाग नियंत्रक, विविध अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच ऑटोचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री सरनाईक यांनी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ वाहनाच्या माध्यमातून ऑटोचालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ‘पीएम राहत’ आणि ‘राहवीर’ योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यासह शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रसार सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

