Mahabreaking

[breaking_news]

Teachers’ Constituency election :शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; पाच जिल्ह्यांतील ८१ केंद्रांवर उद्या मतदान

Teachers’ Constituency election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणूक रिंगणातील २६ उमेदवारांचे भवितव्य ३५ हजार ८१० शिक्षक मतदारांच्या हातात असणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची उद्या रंगणार निवडणूक; २६ उमेदवारांचे भवितव्य ३५ हजार ८१० शिक्षक मतदारांच्या हाती

Amravati

बुलढाणा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणूक रिंगणातील २६ उमेदवारांचे भवितव्य ३५ हजार ८१० शिक्षक मतदारांच्या हातात असणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रे

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ८१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी २४३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध राहावे, यासाठी ५३ अधिकारी-कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी अशा पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांवरील प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ८१ मतदान केंद्रांच्या नियंत्रणासाठी २८ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलढाण्यात ९ हजारांहून अधिक मतदार

या निवडणुकीत जिल्हानिहाय मतदारसंख्येवर नजर टाकली असता, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ९७ मतदार असून, त्यापाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यात ९ हजार १२४ मतदार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ६ हजार ९३२, अकोला जिल्ह्यात ५ हजार ९४२, तर वाशिम जिल्ह्यात ३ हजार ७१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

  • अमरावती : २५ केंद्रे
  • अकोला : १३ केंद्रे
  • बुलढाणा : १८ केंद्रे
  • वाशिम : ७ केंद्रे
  • यवतमाळ : १८ केंद्रे

अशा प्रकारे पाच जिल्ह्यांतील ८१ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिक्षक मतदारांना मतदानासाठी विशेष सवलत

मतदार असलेल्या शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. मात्र, खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू नसल्याने अशा मतदारांना मतदानासाठी वेळ मिळावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार तासांची विशेष सवलत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदानासंबंधीची माहितीही केंद्राबाहेर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मतदान केंद्रांच्या परिसरात कडक निर्बंध

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात सार्वजनिक किंवा खासगी जागेत ध्वनिवर्धक, लाऊडस्पीकर अथवा अन्य ध्वनिक्षेपक उपकरणे लावण्यास व वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात राजकीय पक्षांना बूथ किंवा मंडप उभारता येणार नाहीत. बेकायदेशीर जमाव, प्रचार आणि मतदारांना प्रलोभने देऊन प्रभावित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यासंदर्भात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मतपेट्यांसाठी कडक सुरक्षा; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या सुरक्षितपणे मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदानानंतर सर्व मतपेट्या अमरावती येथील लोकशाही भवनात उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत.

या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवनात होणार आहे. त्यामुळे मतदानानंतर उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष मतमोजणीकडे लागणार आहे.

अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी सर्व पात्र शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top