A young man from Mehkar died : मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा २६ वर्षीय मुलगा प्रज्वल वसंत गिरी याचा लोणावळा येथे दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिक्षणासाठी पुण्यात होता वास्तव्यास,पाय घसरुन पडला दरीत
मेहकर :मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा २६ वर्षीय मुलगा प्रज्वल वसंत गिरी याचा लोणावळा येथे दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रज्वल हा पुणे येथे बी.एड.चे शिक्षण घेत होता आणि त्याचबरोबर एमपीएससी परीक्षेची तयारीही करत होता. ८ फेब्रुवारी रोजी तो आपल्या नातेवाईकांसोबत कारने मुंबईहून पुण्याकडे येत असताना लोणावळा येथे अल्पोपहारासाठी थांबले होते. त्यावेळी प्रज्वल व त्याचा मावस भाऊ टेकडीवर फेरफटका मारण्यासाठी गेले. मात्र, पाय घसरल्याने प्रज्वल खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रा. वसंत गिरी हे मेहकर येथील मे. ए. सो. महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून ते राज्यभर प्रसिद्ध व्याख्याते आहेत. त्यांच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे पाचशेपेक्षा अधिक प्रयोग सादर झाले आहेत, तर क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे हजाराहून अधिक सादरीकरण त्यांनी केले आहे. त्यांच्या पाच पुस्तकांचेही प्रकाशन झाले आहे.
एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले. प्रज्वलच्या पार्थिवावर मेहकर येथे उद्या सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

