Mahabreaking

[breaking_news]

Jalindar Budhwat: शांतीत क्रांती! जालिंदर बुधवत जिल्हा बँकेत बिनविरोध; राजकीय वजन वाढले

Jalindar Budhwat: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत व्हीजेएनटी (विमुक्त जाती-भटक्या जमाती) राखीव मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ११ ऑगस्ट रोजी तब्बल नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने बुधवत यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

Jalindar Budhwat

  नऊ उमेदवारांची माघार अन् बुधवतांचा मार्ग सुकर; जिल्हा बँकेत बिनविरोध प्रवेश

पंडीत सावळे 

मासरुळ : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत व्हीजेएनटी (विमुक्त जाती-भटक्या जमाती) राखीव मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांची बिनविरोध निवड झाली. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ११ ऑगस्ट रोजी तब्बल नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने बुधवत यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

व्हीजेएनटी मतदारसंघातून गणपत कुसळकर, किरण विनायक राठोड, जंगलसिंग राठोड, रामविजय बुरुंगले, उषा भगवान मुंडे, हिरासिंग घोती, उज्वला गणेश मोरे, गणेश मुख्त्यारसिंग मोरे आणि शिवराज तोताराम कायंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे बुधवत यांची संचालकपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.

जालिंदर बुधवत यांची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात ‘शांतीत क्रांती’ घडविणारा नेता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. कोणताही मोठा गाजावाजा न करता राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळविण्याची त्यांची शैली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही प्रकर्षाने दिसून आली. नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा बिनविरोध विजय झाला असून, या घडामोडीमागील राजकीय समीकरणांची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मासरूळ जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कमलताई बुधवत यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. जालिंदर बुधवत यांनी सोयगावचे माजी सरपंच, शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच दोन वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले आहे.

सहकारातील प्रवेशाने राजकीय ताकद वाढणार?

जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने बुधवत यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेत प्रवेश मिळाल्याने आगामी काळात त्यांचे राजकीय वजन आणि प्रभावक्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘मातोश्री’च्या जवळचे नेते म्हणूनही बुधवत यांची राजकीय वर्तुळात चर्चा होते. त्यामुळे जिल्हा बँकेतील त्यांची बिनविरोध निवड ही केवळ सहकार क्षेत्रातील यश न मानता आगामी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

बुधवत यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत अभिनंदन केले. दरम्यान, नऊ उमेदवारांनी एकाचवेळी माघार घेतल्याने या निवडणुकीतील राजकीय जुळवाजुळव आणि आगामी काळातील समीकरणांबाबत जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top