45 goats were burned to death : तालुक्यातील घुसरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल शालिग्राम घावट यांच्या शेतातील शेळयांच्या गोठ्याला रविवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत ३५ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर १० शेळ्या पूर्णतः जळून राख झाल्या. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

अकोला : तालुक्यातील घुसरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल शालिग्राम घावट यांच्या शेतातील शेळयांच्या गोठ्याला रविवार, १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत ३५ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर १० शेळ्या पूर्णतः जळून राख झाल्या. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर माहितीनुसार, अनिल घावट यांच्याकडे सुमारे एक एकर शेती असून त्या शेतात बकऱ्यांसाठी २० बाय ५० फूट आकाराचे शेड उभारले होते. या शेडमध्ये एकूण ४५ बकऱ्या होत्या. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी त्यांनी बकऱ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. संध्याकाळी सर्व बकऱ्यांना शेडमध्ये आणून चारा-पाणी केल्यानंतर ते जेवणासाठी घरी गेले. जेवणानंतर पुन्हा शेतात गेले असता, बकऱ्यांचे शेड आगीत जळून खाक झाल्याचे आणि सर्व बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेची माहिती तात्काळ अकोट फाईल पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश इंगळे, परवीन धरमकर, संतोष डाबेराव व विकास सुरनर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश मस्के यांनी घटनास्थळी येऊन मृत बकऱ्यांची वैद्यकीय तपासणी व पंचनामा केला. तसेच या घटनेची माहिती अकोला तहसीलदार कुणाल झाल्टे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हातोडी हलक्याचे तलाठी कार्तिक वानखडे, भगत व संतोष खेतखेडे यांनीही घटनास्थळी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. पुढील तपास अकोट फाईल पोलीस स्टेशन करीत आहे.

