Mahabreaking

[breaking_news]

Safe Childhood Campaign :बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचे कवच! एकलारा येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’

Safe Childhood Campaign : बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने संग्रामपूर तालुका विधी सेवा समिती तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संग्रामपूर तालुक्यातील एकलारा-बानोदा येथील श्री खोटेश्वर महाराज विद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Safe Childhood

  गुड टच-बॅड टचपासून पॉक्सो कायद्यापर्यंत धडे; विद्यार्थ्यांना दिले बालसंरक्षणाचे मार्गदर्शन

विवेक राऊत

संग्रामपूर : बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि बालकांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने संग्रामपूर तालुका विधी सेवा समिती तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संग्रामपूर तालुक्यातील एकलारा-बानोदा येथील श्री खोटेश्वर महाराज विद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात विद्यार्थ्यांना बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या पॉक्सो (POCSO) कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुड टच आणि बॅड टच यातील फरक समजावून सांगत, अनुचित स्पर्श किंवा अत्याचाराच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि आपल्यासोबत घडलेल्या अन्यायाविरोधात कुठे दाद मागावी, याची माहिती देण्यात आली.

यावेळी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ बाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालकांवर होणारे अत्याचार, बालहक्कांचे उल्लंघन किंवा अडचणीच्या प्रसंगी या मोफत हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत कशी मिळवता येते, याची माहिती देण्यात आली. बालकांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला न घाबरता संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शक वकील ॲड. सौ. पी. यू. भोंडे, संग्रामपूर येथील डॉ. सौ. सुरतकार, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल तानपुरे, वकील संघाच्या वतीने ॲड. एस. बी. सुरळकार, ॲड. एन. एस. गव्हांदे, ॲड. व्ही. एम. बावणे, ॲड. आर. एस. राऊत तसेच ॲड. जे. जी. दातार उपस्थित होते. याशिवाय विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. व्ही. सपकाळ सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. संतोष ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पॅरा लीगल व्हॉलेंटिअर (PLV) राजेश्वर सपकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top