crisis strikes : दिवाळीच्या आनंदोत्सवात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना गुगळी येथील शेतकरी गुणवंतराव गणेशराव देशमुख यांच्या शेतातील गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, दिवाळीच्या सणाच्या दिवशीच देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वर्षभराच्या कष्टाची राखरांगोळी! २२ क्विंटल कापूस, गहू, मका अन् शेती साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी
धामणगाव बढे : दिवाळीच्या आनंदोत्सवात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना गुगळी येथील शेतकरी गुणवंतराव गणेशराव देशमुख यांच्या शेतातील गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, दिवाळीच्या सणाच्या दिवशीच देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या भीषण आगीत गोदामात साठवून ठेवलेला २२ क्विंटल कापूस, १४ क्विंटल गहू, ६ क्विंटल मका, चार एकर क्षेत्रासाठीचा ठिबक सिंचन संच तसेच चार ट्रॉली कुट्टी चारा जळून खाक झाला. मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल आणि शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने देशमुख यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शैलेद्र राजपूत आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल डागोर यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली.
एकीकडे संपूर्ण परिसरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे एका शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाची राखरांगोळी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या संकटामुळे देशमुख कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकरी गुणवंतराव देशमुख यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

