Buffalo electrocuted: शेतात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या तीन म्हशींपैकी एका म्हशीचा विद्युत खांबाच्या तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेत शेतकरी संतोष सर्जेराव पवार यांचे अंदाजे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सिंदखेड राजा मार्गावर विजेचा कहर; विद्युत तारेला स्पर्श होताच म्हशीचा मृत्यू
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शेतात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या तीन म्हशींपैकी एका म्हशीचा विद्युत खांबाच्या तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेत शेतकरी संतोष सर्जेराव पवार यांचे अंदाजे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पिंपळनेर येथील शेतकरी संतोष सर्जेराव पवार यांच्या मालकीच्या तीन म्हशी असून, त्यांच्या आई संगिता सर्जेराव पवार या नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गावाजवळील शेतात घेऊन गेल्या होत्या. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता त्या म्हशी घेऊन शेतात गेल्या होत्या.
दुपारी सुमारे ४ वाजता म्हशी चारून त्या सिंदखेड राजा रस्त्याने घराकडे परतत असताना बुगदानी महाराज यांच्या शेताजवळील लोखंडी विद्युत खांबाच्या तारेच्या संपर्कात एक म्हैस आली. विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने मु-हा जातीच्या या म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या म्हशीची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये असल्याचे संतोष पवार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेनंतर संतोष पवार यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात येऊन तोंडी रिपोर्ट दाखल केला असून, संबंधित घटनेची दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

