Spree of cable thefts : गोरेगाव शिवारातील सात शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांवरील केबल वायर चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

साखरखेर्डा : गोरेगाव शिवारातील सात शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांवरील केबल वायर चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून साखरखेर्डा, राताळी, मोहाडी, सवडद, गुंज, गुंजमाथा, सावंगी भगत आणि गोरेगाव परिसरातील शेतांमध्ये बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांवरील वीज जोडणीच्या तांब्याच्या केबल वायर चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. रात्रीच्या वेळी चोरटे सौरऊर्जा प्रकल्पांवरील केबल तोडून नेत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांत गोरेगाव शिवारातील अभिमन्यू इंगळे, गिरीश पांचाळ, प्रविण सखाराम गवई, जयदीप महाजन, सखाराम गिनाजी गवई, संगिता रमेश कव्हळे आणि विनायक पंचाळ यांच्या शेतातील सौरऊर्जा प्रकल्पांवरील केबल वायर चोरट्यांनी तोडून नेल्या. यामुळे सौरऊर्जा प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, या चोरीच्या घटना रात्रीच्या वेळी घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साखरखेर्डा पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चोरट्यांचा शोध लावावा आणि सौरऊर्जा प्रकल्पांवरील केबल चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

