Mahabreaking

[breaking_news]

illegal stock: धाब्यावर पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार; ७२० लिटर इंधनाचा अवैध साठा जप्त

illegal stock: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धाब्यावर विनापरवाना पेट्रोल व डिझेलचा साठा करून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांवर बोरगाव मंजू पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी धाब्याच्या मागील बाजूस टिनाच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले तब्बल ७२० लिटर पेट्रोल-डिझेल, अंदाजे ६४ हजार ८०० रुपये किमतीचे, जप्त केले. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

borgaon manju

   एनएच-५३वरील धाब्यावर पोलिसांचा छापा; ६४ हजार ८०० रुपयांचे पेट्रोल-डिझेल जप्त

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धाब्यावर विनापरवाना पेट्रोल व डिझेलचा साठा करून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांवर बोरगाव मंजू पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी धाब्याच्या मागील बाजूस टिनाच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले तब्बल ७२० लिटर पेट्रोल-डिझेल, अंदाजे ६४ हजार ८०० रुपये किमतीचे, जप्त केले. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांना गुप्त बातमीदारामार्फत एनएच-५३ वरील ग्राम कुरणखेड ते टोल प्लाझा दरम्यान असलेल्या बाबा रामदेव शुद्ध शाकाहारी राजस्थानी धाब्यावर पेट्रोल व डिझेलचा अवैध साठा करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक वानखडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह धाब्यावर छापा टाकला.

कारवाईदरम्यान धाबा मालक चाँद खान नासीर खान पठाण (वय ३६, रा. मुलानी चौक, खदान, अकोला) आणि जहीर अहमद जहुर अहमद (वय ४१, रा. जिरा बावडी, इस्लाम चौक, खदान, अकोला) हे दोघे तेथे उपस्थित आढळून आले. पोलिसांनी धाब्याची झडती घेतली असता मागील बाजूस असलेल्या टिनाच्या शेडमध्ये चार निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम आढळले.

यातील दोन ड्रममध्ये प्रत्येकी १८० लिटरप्रमाणे एकूण ३६० लिटर डिझेल, ज्याची अंदाजे किंमत २८ हजार ८०० रुपये, तर अन्य दोन ड्रममध्ये एकूण ३६० लिटर पेट्रोल, ज्याची अंदाजे किंमत ३६ हजार रुपये असल्याचे समोर आले. अशाप्रकारे एकूण ७२० लिटर पेट्रोल व डिझेल, किंमत अंदाजे ६४ हजार ८०० रुपये, विनापरवाना साठवून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या पेट्रोल-डिझेलचा आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबत दोन्ही संशयितांकडे विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. सुरक्षिततेच्या दृष्टीने जप्त करण्यात आलेले पेट्रोल व डिझेल कविता पेट्रोलपंप येथे जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शेखर कोद्रे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमातील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’ संकल्पनेअंतर्गत आर्थिक फायद्यासाठी पेट्रोल व डिझेलचा अवैध साठा आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मुर्तिजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस अंमलदार सुदीप राऊत आणि शेखर कोद्रे यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top