Wainganga-Nalganga: जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, शेतीसाठीची गरज आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा व सिंचन योजनांचा आढावा घेत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

शेतकरी आणि शहराच्या पाण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार; वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासह जलयोजनांचा आढावा
गजानन तिडके
बुलढाणा : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, शेतीसाठीची गरज आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा व सिंचन योजनांचा आढावा घेत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध आढावा बैठकींमध्ये आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बुलढाणा व मोताळा तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, भविष्यातील वाढती मागणी आणि योजनांच्या अंमलबजावणीचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून वंचित भागांना पाणी देण्याची चाचपणी
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा बुलढाणा मतदारसंघातील अधिकाधिक भागाला लाभ मिळावा, यासाठी प्रकल्पातून वंचित राहणाऱ्या भागांना सिंचन, पिण्याचे पाणी तसेच औद्योगिक वापरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याच्या शक्यता तपासण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितले.
येळगाव जलाशयाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव
बुलढाणा शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर येळगाव जलाशयाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जलाशयाची क्षमता वाढविणे शक्य आहे का, याबाबत तांत्रिक व प्रशासकीय बाबी तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
खडकपूर्णा प्रकल्पात दोन लघुतलावांच्या समावेशाची हालचाल
खडकपूर्णा प्रकल्पात अंचरवाडी लघुपाटबंधारे तलाव क्रमांक १ आणि मिसळवाडी लघुतलावाचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. या समावेशामुळे संबंधित भागातील सिंचन आणि पाणी उपलब्धतेला चालना मिळण्याची शक्यता असून, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा आणि सिंचन प्रकल्पांना केवळ प्रशासकीय मंजुरीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर आगामी काळात कोणत्या योजना प्रत्यक्ष मार्गी लागतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

