Bibi reverberates: विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून शेगावकडे परतीचा प्रवास करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा मुक्काम बीबी येथे झाला. पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात श्रींच्या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

फटाक्यांची आतषबाजी, टाळ-मृदंगाचा गजर; बीबी येथे श्रींच्या पालखीचे भक्तिमय स्वागत
रमेश खंडागळे
बीबी : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून शेगावकडे परतीचा प्रवास करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा मुक्काम बीबी येथे झाला. पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात श्रींच्या पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अभय चव्हाण आणि बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी विणेकरी व वारकऱ्यांच्या उपस्थितीत गजानन महाराजांच्या पालखीवर पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी एक दिवस अगोदरच मार्गाची स्वच्छता करून रांगोळ्या काढून परिसर सजविला होता.
पावसाळ्याचे दिवस असल्याने बीबी ग्रामस्थ व गजानन भक्तांच्या वतीने पालखीच्या मुक्कामासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. वसंतराव नाईक महाविद्यालयातील वर्गखोल्या स्वच्छ करून रांगोळ्यांनी सजविण्यात आल्या. तसेच वीज, पंखे आणि अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.
पालखी शाळेच्या प्रांगणात दाखल होताच गावचे सरपंच दीपक गुलमोहर, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच पंचक्रोशीतील मान्यवरांनी पालखीची आरती करून स्वागत केले व दर्शन घेतले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण गाव ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
राजकीय व सामाजिक संस्था, तरुण मंडळी, विविध ग्रुप तसेच सेवेकऱ्यांच्या सहभागामुळे पालखी सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. बीबी परिसरातील विविध खेड्यांमधून महिला, पुरुष आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने पालखीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. त्यामुळे पालखी सोहळ्याला एक दिवसाच्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. बालगोपाळांसाठी छोट्या-मोठ्या दुकानदारांनी खेळणी व विविध वस्तूंची दुकाने थाटली होती.
या सोहळ्यात बीबी येथील आयुर्वेदाचार्य वैद्य गोपाल खंडागळे आणि त्यांच्या सहकारी वैद्यांनी पालखीतील भक्तांच्या पायांना आयुर्वेदिक तेलाने मालिश करून सेवा दिली. ठिकठिकाणी भाविकांसाठी खाऊ, फराळ तसेच भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता श्रींचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ५ वाजता पालखीने किनगाव जट्टूकडे प्रस्थान केले. पालखीचा पुढील मुक्काम लोणार येथे होता.
पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन सोनटक्के यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बीबी पोलीस ठाण्याच्या वतीने दरवर्षी पालखीतील गजानन भक्तांना टोपी आणि रुमाल देऊन स्वागत करण्यात येते. यंदाही ही परंपरा जपण्यात आली.
पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी बीबी येथील ग्रामस्थ, गजानन भक्त, तरुण मंडळी तसेच महिला-पुरुषांनी परिश्रम घेतले.

