Demanded five thousand :खर्चासाठी पाच हजार रुपये मागितल्यावर पैसे नसल्याचे सांगणाऱ्या आईला मुलाने शिवीगाळ करून विटेने डोक्यात मारहाण केल्याची घटना पिंपळगाव चिलमखा शिवारात ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पैशांसाठी आईलाच शिवीगाळ अन् विटेने हल्ला; देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा
देऊळगाव राजा : खर्चासाठी पाच हजार रुपये मागितल्यावर पैसे नसल्याचे सांगणाऱ्या आईला मुलाने शिवीगाळ करून विटेने डोक्यात मारहाण केल्याची घटना पिंपळगाव चिलमखा शिवारात ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंगना लखन भोसले (वय ३४, रा. संजय नगर, देऊळगाव राजा) आणि आरोपी रोहन लखन भोसले हे आई-मुलगा आहेत. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पिंपळगाव चिलमखा शिवारात आरोपी रोहन याने आई कंगना यांच्याकडे खर्चासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली.
मात्र, आपल्याजवळ पैसे नसल्याचे कंगना यांनी सांगितले. यावरून आरोपीने त्यांना शिवीगाळ करून ‘तू मला पैसे कसे देत नाहीस?’ असे म्हणत तेथे पडलेली विट उचलली आणि त्यांच्या डोक्यात, उजव्या कानाच्या वरच्या बाजूस मारली. या हल्ल्यात कंगना यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
जखमी कंगना भोसले यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी कायमी गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे (ब.नं. २१५५) करीत आहेत.

