Sarpanch : सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मानसिक त्रास व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत करमोडा येथील सरपंचाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ११ ऑगस्ट रोजी लोहगाव शिवारात घडली. आत्महत्येपूर्वी संबंधित सरपंचाने सोशल मीडिया स्टेटसद्वारे आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह धमकी दिल्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सरपंचपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव; त्रासाला कंटाळून करमोडाच्या सरपंचाने जीवन संपविले
संग्रामपूर : सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मानसिक त्रास व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत करमोडा येथील सरपंचाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ११ ऑगस्ट रोजी लोहगाव शिवारात घडली. आत्महत्येपूर्वी संबंधित सरपंचाने सोशल मीडिया स्टेटसद्वारे आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह धमकी दिल्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मृतक दीपक प्रकाश उगले (वय ४६, रा. करमोडा, ता. संग्रामपूर) हे करमोडा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे (वय अंदाजे ३५, रा. करमोडा) हा गेल्या तीन वर्षांपासून दीपक उगले यांच्यावर सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप आहे.
आत्महत्येपूर्वी स्टेटसद्वारे व्यथा मांडल्याचा दावा
पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी दीपक उगले यांनी सोशल मीडिया स्टेटसवर एक व्हिडिओ ठेवला होता. त्यामध्ये संबंधित व्यक्तीकडून सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी वारंवार फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. ‘मला सरपंच व्हायचे आहे, त्यामुळे लवकरात लवकर राजीनामा दे,’ असा दबाव आणला जात असल्याचा आरोपही या स्टेटसमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तसेच आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचेही मृतकाने स्टेटसमध्ये नमूद केल्याचा दावा आहे. आरोपीचे राजकीय प्राबल्य असल्याने त्याच्यापासून कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याचेही त्यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शेतातील झाडाला गळफास
११ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजण्यापूर्वी दीपक उगले यांनी लोहगाव शिवारातील गट क्रमांक ६९ मधील त्यांच्या शेतात निंबाच्या झाडाला पांढऱ्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मृतकाचे नातेवाईक श्रीकृष्ण प्रकाश उगले यांनी तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे तामगाव पोलिसांनी वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०८ आणि ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे करीत आहेत. आत्महत्येपूर्वी ठेवण्यात आलेल्या स्टेटसची सत्यता, त्यातील आरोप, कथित धमक्या तसेच आरोपीची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

