Gavandgaon : गावंडगाव येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बंजारा समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात चान्नी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिली.

आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी १२ ऑगस्टला मोर्चाचा इशारा
निशांत गवई
पातूर : गावंडगाव येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बंजारा समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात चान्नी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच गावंडगाव तांड्यातील सुमारे ५०० नागरिक चान्नी पोलीस ठाण्यात उपस्थित झाले. यावेळी नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवत संबंधितांवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
१२ ऑगस्टला मोर्चाचा इशारा
दरम्यान, प्रशासनाकडून तातडीने ठोस कारवाई न झाल्यास बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकल गोर बंजारा आरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय व संविधानिक मार्गाने मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मोर्चाचे नेतृत्व पुतळा संरक्षण समिती, गावंडगाव-अकोलाचे रामेश्वर ज. राठोड करणार आहेत. समितीचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाकडे विविध मागण्या
स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी दोषी व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, घटनास्थळावरील सर्व पुरावे तपासावेत तसेच घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच विटंबना झालेल्या अर्धपुतळ्याची योग्य दुरुस्ती करून पुनर्स्थापना करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी घटनास्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“महापुरुषांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर १२ ऑगस्ट रोजी शांततामय व संविधानिक मार्गाने मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा रामेश्वर ज. राठोड यांनी दिला.
दरम्यान, पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या तीन जणांची चौकशी सुरू असून, तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

