Car falls into 80-foot deep well: भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेटा कार सुमारे ८० फूट खोल विहिरीत कोसळली. या दुर्दैवी दुर्घटनेत सासू आणि सुनेचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी हजारोंच्या उपस्थितीत दोघींवर एकाच वेळी शेजारी-शेजारी दफनविधी करण्यात आला.

धावड्यावर शोककळा; हजारोंच्या उपस्थितीत सासू-सुनेचा एकाच वेळी दफनविधी
गजानन तिडके
बुलढाणा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रेटा कार सुमारे ८० फूट खोल विहिरीत कोसळली. या दुर्दैवी दुर्घटनेत सासू आणि सुनेचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी हजारोंच्या उपस्थितीत दोघींवर एकाच वेळी शेजारी-शेजारी दफनविधी करण्यात आला.
दरम्यान, विहिरीतील पाण्याचा रात्रभर उपसा केल्यानंतर शनिवारी सकाळी अग्निशामक दल आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून विहिरीतून कार तसेच अख्तरबी अमानुल्ला खान यांचा मृतदेह बाहेर काढला.
भुसार मालाचे व्यापारी जियाउल्ला खान यांचे कुटुंबीय सावंगी अवघडराव येथील अंत्यसंस्कार आटोपून क्रेटा कारने धावडा येथे परतत होते. पद्मावती गावाजवळ अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार रस्त्याशेजारील सुमारे ८० फूट खोल विहिरीत जाऊन कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील इतरांना तातडीने बाहेर काढले. मात्र, कारमध्येच अडकलेल्या सासू अख्तरबी अमानुल्ला खान (वय ७५) यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. दुसरीकडे, उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांची सून सुलताना बी जियाउल्ला खान (वय ४५) यांचा वाटेतच मृत्यू झाला.
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. अखेर रात्रभर पाण्याचा उपसा करण्यात आला. शनिवारी सकाळी अग्निशामक दल आणि पोलिसांनी विहिरीत उतरून कारसह अख्तरबी यांचा मृतदेह बाहेर काढला.
त्यानंतर वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी दुपारी १ वाजता धावडा येथील मोठ्या कब्रस्तानात हजारोंच्या उपस्थितीत अख्तरबी अमानुल्ला खान आणि सुलताना बी जियाउल्ला खान यांच्यावर एकाच वेळी शेजारी-शेजारी दफनविधी करण्यात आला.
या हृदयद्रावक घटनेमुळे धावडा परिसरासह वालसावंगी, पारध, भोकरदन आणि सिल्लोड परिसरात शोककळा पसरली आहे.

