The body of the youth : शेतीचे काम आटोपून शुक्रवारी दुपारी एक वाजता घरी परतणाऱ्या शाहिद असिफ देशमुख (वय २५) या युवकाचा मन नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल २२ तासांच्या अथक शोधानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता मानेगावजवळ त्याचा मृतदेह हाती लागला.

रेती उत्खननाच्या खोल खड्ड्यांनी घेतला युवकाचा जीव?; दोन चिमुकल्यांचा आधार हरपला
लोहारा : शेतीचे काम आटोपून शुक्रवारी दुपारी एक वाजता घरी परतणाऱ्या शाहिद असिफ देशमुख (वय २५) या युवकाचा मन नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल २२ तासांच्या अथक शोधानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता मानेगावजवळ त्याचा मृतदेह हाती लागला. या घटनेने लोहारा परिसर हादरला असून, धरणातून सोडण्यात आलेले अचानक पाणी तसेच मन नदीपात्रात रेती उत्खननासाठी करण्यात आलेले खोल खड्डे या दुर्घटनेला कारणीभूत ठरले का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे एक वाजता शाहीद देशमुख हे शेतातील वखरणीचे काम आटोपून बैलगाडीने गावाकडे परतत होते. मन नदी पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. बैलगाडीला दोन बैल जुंपलेले होते, तर अन्य दोन बैल मागील बाजूस बांधलेले होते. नदीतील वाढता पाण्याचा प्रवाह, भंवर आणि खोल पाण्यामुळे बैलगाडी उलटली आणि शाहीद हे चारही बैलांसह पाण्यात वाहून गेले.
या दुर्घटनेत चारही बैलांचा मृत्यू झाला. बैलांना नदीतून बाहेर काढण्यात आले; मात्र शाहीद यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.
घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर, तहसीलदार वैभव फरतारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे तसेच उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले.
पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली गोपाल गीरे, ऋषीकेश राखोंडे, शेखर केवट, निलेश खंडारे, शाम घोंगे, शुभम भोपळे, गौरव गाडगे, ऋतिक वाघ, सतीश वानखडे, हर्षल वानखडे, यश जवके, अमित जवके आणि रामभाऊ दोरकर यांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवली.
शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेली शोधमोहीम रात्रीपर्यंत सुरू होती. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. शनिवारी सकाळी आठ वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान, घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर मानेगावजवळील एका डोहात शाहीद यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नातेवाईक आणि मच्छीमारांना दिसून आला. मच्छीमार बांधवांनी तातडीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.
यावेळी उरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी सविता पाटील, तलाठी अविनाश राऊत, तलाठी नंदकिशोर जाने, कोतवाल प्रशांत राठोड तसेच स्थानिक नागरिक आणि नातेवाईक उपस्थित होते.
शोधमोहीमेत मनोहर तायडे, प्रल्हाद भांगे, देवमन पारीसे, सरपंच मोरे आणि भागवत माळी, बहादुरा यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले.
जीव धोक्यात घालून प्रतिकूल परिस्थितीत अथक शोधमोहीम राबविणाऱ्या बचाव पथकाच्या तत्परतेचे आणि धाडसाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. या दुर्दैवी घटनेमुळे लोहारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला!
मृत युवकाच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. त्यापैकी एक अवघे दोन वर्षांचे, तर दुसरे केवळ सहा महिन्यांचे आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या युवकाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नदीत खोल खड्डे कोणी केले?
पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानंतर नदीपात्रातील रेती उत्खननामुळे निर्माण झालेले मोठमोठे खड्डे पाण्याखाली गेले. त्यामुळे नदीपात्राचा नैसर्गिक प्रवाह आणि खोली अधिक धोकादायक बनली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
मन नदीपात्रात पहिल्यांदाच जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नदीपात्रात निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली होती का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
रेती घाटाच्या ठेकेदारावर कारवाई होणार की फक्त चौकशी?
या दुर्घटनेनंतर महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेती घाटाचा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराने उत्खननाचे सर्व नियम पाळले होते का? परवानगीपेक्षा अधिक खोलीपर्यंत उत्खनन करण्यात आले का? नदीपात्रात जेसीबी आणि पोकलॅन्डचा वापर करण्यास परवानगी होती का? या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
एका युवकाचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? नियमबाह्य उत्खनन आढळल्यास संबंधित ठेकेदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल लोहारा परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
‘महसूल’च्या नजरेआड सुरू होते उत्खनन?
रेती उत्खननाला परवानगी देताना नदीपात्राची सुरक्षितता, उत्खननाची मर्यादा आणि पावसाळ्यातील संभाव्य धोका यांचा विचार करण्यात आला होता का, याची चौकशी होणे आवश्यक आहे. रेती उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांत माणसाचा जीव जाण्यापर्यंत प्रशासनाने वाट पाहायची का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

