Major relief : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २९५.४७ कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आधार प्रमाणीकरण करा, कर्जमाफीचा लाभ घ्या; ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन
गजानन तिडके
बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २९५.४७ कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ५,०२९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) सहभागी झाले होते.
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण १ लाख १५ हजार ५१६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८५ हजार ४५३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून, ३० हजार ६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांना टप्प्याटप्प्याने लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणीकरण होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने जिल्हा अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.
तत्काळ खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्देश
राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे. चालू हंगामातील पीक कर्ज वितरणासाठी बँकांनी आवश्यक नियोजन पूर्ण केले असून, शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनावश्यक गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा अग्रेसर बँक व्यवस्थापक यांनी केले आहे.

