Deepak Sadafale: समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन तसेच जीव वाचविण्याच्या धाडसी कार्याबद्दल मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात महसूल प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

जीव वाचविणाऱ्या धाडसी सेवेला सलाम; महसूल प्रशासनाकडून दीपक सदाफळे यांचा विशेष सत्कार
बाळापूर : समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन तसेच जीव वाचविण्याच्या धाडसी कार्याबद्दल मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात महसूल प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

बाळापूर येथे आयोजित शिबिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपक सदाफळे यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष येऊलीकर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करताना, “आपत्तीच्या काळात दीपक सदाफळे यांनी केलेले शोध, बचाव आणि मदतकार्य समाजासाठी प्रेरणादायी असून अनेकांसाठी आदर्शवत आहे,” असे गौरवोद्गार काढले.

दीपक सदाफळे यांनी गेल्या काही वर्षांत बाळापूर व पातूर तालुक्यातील मळसूर धरणात बुडालेले सुमारे १५ ते २० मोटारपंप व केबल सुरक्षितपणे बाहेर काढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच बाळापूर परिसरातील विविध नद्या व जलाशयांमध्ये बुडालेल्या चार ते पाच व्यक्तींचे मृतदेह शोधून काढण्यासाठी त्यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे.
याशिवाय गणेशोत्सव आणि दुर्गा विसर्जनादरम्यान नदीपात्रात सुरक्षा व्यवस्था सांभाळून अनेक संभाव्य दुर्घटना टाळण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या चार वारकऱ्यांचे प्राण वाचवून त्यांनी आपल्या धाडसाची आणि सेवाभावाची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महसूल प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास बाळापूर व पातूर तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सन्मानाची माहिती नायब तहसीलदार नितीन निंबोळकर यांनी दिली.

