Marginal farmer: सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पातूर तालुक्यातील गावंडगाव येथे शनिवार (दि. १ ऑगस्ट) रोजी घडली. नरेंद्र मेराम चव्हाण (वय ४९) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावंडगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सततची नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली; गावंडगाववर शोककळा
निशांत गवई
पातूर : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पातूर तालुक्यातील गावंडगाव येथे शनिवार (दि. १ ऑगस्ट) रोजी घडली. नरेंद्र मेराम चव्हाण (वय ४९) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावंडगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र चव्हाण यांच्या नावे चिचखेड (पिंपळखुटा) शिवारात सुमारे तीन एकर शेती होती. या शेतीवरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्चही शेतीच्या उत्पन्नातून भागविला जात होता.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी, अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पीक नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतीतून उत्पन्न मिळणे कठीण झाले होते. त्यातच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
या आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अधिकृत चौकशी आणि संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
नरेंद्र चव्हाण हे मनमिळाऊ, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून गावात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे गावंडगावसह परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, नापिकी आणि शेतीतील वाढत्या खर्चाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

