Aregaon school: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या उद्देशाने सनशाईन हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, आरेगाव येथे शनिवारी (१ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

‘डिजिटल शिक्षणाची गंगा’ आरेगावात; सनशाईन हॉस्पिटलच्या पुढाकाराने जि.प. शाळा झाली हायटेक
डोणगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या उद्देशाने सनशाईन हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, आरेगाव येथे शनिवारी (१ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आरेगावचे रहिवासी, शाळेचे माजी विद्यार्थी तथा महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना मंत्रालय, मुंबई येथील संचालक सोहम वायाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी सनशाईन हॉस्पिटलचे डॉ. नदीम शहा, मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, कृषी विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, केंद्रप्रमुख विनोद ढवळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पवार तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ठाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सोहम वायाळ यांनी सांगितले की, “ज्ञान, तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हा नवा अध्याय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरेल. जिल्हा परिषद शाळांमधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. मी स्वतः या शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत शिक्षण मिळावे, या उद्देशाने डॉ. नदीम शहा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेला डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून दिली. याचा निश्चितच विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल.”
डॉ. नदीम शहा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सनशाईन हॉस्पिटलने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा डिजिटल क्लासरूम उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी या आधुनिक सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन उच्च शिक्षण प्राप्त करावे आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे.”
या डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना संगणकीय व दृकश्राव्य माध्यमातून आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक संजय जुमडे, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत सनशाईन हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले.

