Mahabreaking

[breaking_news]

Police raid :शाळेजवळ अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Police raid : मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अनभोरा येथील उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या कथित अवैध देशी दारू विक्रीवर छापा टाकून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या कारवाईत देशी दारूचा साठा आणि दुचाकीसह एकूण ३१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Police raid

  अनभोरा उड्डाणपुलाजवळ अवैध मद्यविक्री उघड; आरोपीसह दुचाकी ताब्यात

अकोला: मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अनभोरा येथील उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या कथित अवैध देशी दारू विक्रीवर छापा टाकून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या कारवाईत देशी दारूचा साठा आणि दुचाकीसह एकूण ३१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक माहाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना अनभोरा बसस्थानक येथे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार, अनभोरा येथील उड्डाणपुलाजवळ कैलास रामू गुंजाळ (वय ४८, रा. वडरपुरा, स्टेशन विभाग, मुर्तिजापूर) हा विनापरवाना देशी दारूची विक्री करीत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकला. तेथे एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन होंडा शाईन (क्र. MH-30-BA-7596) दुचाकीवर बसलेली दिसून आली. संशयिताची झडती घेतली असता त्याच्या पिशवीत ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या २५ सिलबंद क्वार्टर बाटल्या, प्रत्येकी ५० रुपये किंमतीच्या, एकूण १ हजार २५० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. तसेच त्याच्या ताब्यातील अंदाजे ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

आरोपीकडे मद्य बाळगण्याचा अथवा विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून एकूण ३१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मद्याच्या नमुन्यांपैकी एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) स्वतंत्रपणे सीलबंद करण्यात आली.

या प्रकरणी आरोपी कैलास रामू गुंजाळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

विशेष म्हणजे, पोलिसांच्या माहितीनुसार ज्या परिसरात ही कथित अवैध मद्यविक्री सुरू होती, त्या ठिकाणाजवळ जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब गंभीर मानली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top