Verbal abuse escalates : गावातील भैरवनाथ महाराज मंदिर परिसरात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका तरुणाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच त्याच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेऊन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मंदिर परिसरातील वाद विकोपाला; तरुणाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : गावातील भैरवनाथ महाराज मंदिर परिसरात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका तरुणाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच त्याच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेऊन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत तुकाराम बोरकर (वय २५, व्यवसाय-गॅरेज, रा. पांग्री सिंगाव, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नारायण संजय धायडे (रा. पांग्री सिंगाव) याला आरोपी करण्यात आले आहे.
ही घटना २५ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गावातील भैरवनाथ महाराज मंदिराजवळ घडली. फिर्यादी भागवत बोरकर हे दर्शनासाठी मंदिराकडे जात असताना मंदिराशेजारी त्यांचा चुलत भाऊ दीपक नितीन बोरकर आणि आरोपी नारायण धायडे हे एकमेकांशी बोलत उभे होते. त्यावेळी फिर्यादी तेथून जात असताना आरोपीने त्यांच्याकडे पाहून कथितपणे अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता आरोपीने संतापून त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला तोंडात धरून जोराने चावा घेतल्याने अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरडाओरडा ऐकून फिर्यादीचे भाऊ गजानन बोरकर, वडील तुकाराम बोरकर आणि आई विमल बोरकर हे मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी आले. त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भागवत बोरकर यांच्या तोंडी फिर्यादीसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अपराध क्रमांक ३५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२) आणि २९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांनी केली आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

