Mahabreaking

[breaking_news]

Vidarbha:  मिशन २०२७चा एल्गार; स्वतंत्र विदर्भासाठी सिंदखेडराजातून निर्णायक लढ्याची घोषणा

Vidarbha: स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला नव्याने धार देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सिंदखेडराजा येथे आयोजित ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्यात’ विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ‘मिशन २०२७’ ची घोषणा करण्यात आली. विदर्भातील विकासाचा अनुशेष, सिंचनाची रखडलेली कामे, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, औद्योगिक मागासलेपण आणि प्रशासनाकडून होत असलेल्या कथित उपेक्षेचा उल्लेख करत स्वतंत्र विदर्भ हा भावनिक नव्हे, तर न्याय आणि संतुलित विकासाचा प्रश्न असल्याची भूमिका मान्यवरांनी मांडली.

Vidarbha

  ‘स्वतंत्र विदर्भ हा भावनेचा नव्हे, न्यायाचा लढा’; वामनराव चटप यांचा सरकारला इशारा

साखरखेर्डा : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला नव्याने धार देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सिंदखेडराजा येथे आयोजित ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्यात’ विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ‘मिशन २०२७’ ची घोषणा करण्यात आली. विदर्भातील विकासाचा अनुशेष, सिंचनाची रखडलेली कामे, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, औद्योगिक मागासलेपण आणि प्रशासनाकडून होत असलेल्या कथित उपेक्षेचा उल्लेख करत स्वतंत्र विदर्भ हा भावनिक नव्हे, तर न्याय आणि संतुलित विकासाचा प्रश्न असल्याची भूमिका मान्यवरांनी मांडली.

विदर्भातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी, युवक, महिला, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि विदर्भ राज्याचे समर्थक मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पुन्हा एकदा संघटनात्मक बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यामुळे विदर्भ राज्य चळवळीला नवे राजकीय परिमाण मिळाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

मेळाव्याच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नीरज खांदेवाले होते. स्वागताध्यक्ष शिवाजीराजे जाधव यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर सामाजिक एकजुटीची गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक प्रवीण गीते यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मंजुषा तिरपुडे यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक, किसान ब्रिगेडचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विदर्भातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर भाष्य करत, अनेक दशकांपासून विदर्भाला केवळ आश्वासने मिळाली; मात्र विकासाच्या बाबतीत सातत्याने दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप केला. लोकशाही मार्गाने निर्णायक लढा उभारण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

पिक विमा, सिंचन आणि शेतकरी प्रश्नांवर संतप्त चर्चा

मेळाव्याच्या पहिल्या सत्रात पिक विमा योजनेत विदर्भ, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या कथित अन्यायावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी वामनराव जाधव होते. प्रवीण गीते, बालाजी सोसे, उद्योजक दत्तात्रय काकडे आणि अन्य वक्त्यांनी पिक विमा, सिंचन अनुशेष आणि कृषी धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

युवकांच्या प्रश्नांवर स्वतंत्र सत्र

दुसऱ्या सत्रात विदर्भातील युवकांसमोरील शिक्षण, रोजगार आणि स्थलांतराच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी ॲड. दीपक चटप होते. प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी युवकांचे वाढते स्थलांतर, रोजगाराच्या संधींचा अभाव आणि उच्च शिक्षणातील अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी संघटनात्मक बळकटीवर भर दिला.

‘मिशन २०२७’ची घोषणा; सरकारला इशारा

मेळाव्याच्या अखेरच्या खुल्या अधिवेशनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची ऐतिहासिक, घटनात्मक आणि आर्थिक बाजू आकडेवारीसह मांडली. विदर्भातील सिंचन अनुशेष, औद्योगिक गुंतवणुकीचा अभाव, शेतकरी आत्महत्या, वनसंपत्ती व खनिज संपत्तीचे असमान वाटप आणि विकास निधीतील तफावत यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय झाल्याचा दावा त्यांनी केला.

स्वतंत्र विदर्भाची मागणी ही कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून संविधानाने दिलेल्या न्याय्य अधिकारांसाठी असल्याचे सांगत, स्थानिकांना रोजगार, उद्योग, सिंचन आणि विकासाचा समतोल साधण्यासाठी स्वतंत्र राज्य अपरिहार्य असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

चटप यांनी “डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झाली नाही, तर विदर्भातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावात व्यापक जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा देत ‘मिशन २०२७’ अंतर्गत गावागावांत जनसंपर्क, संघटन विस्तार आणि जनजागृती अभियान राबविण्याचे आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती

या अधिवेशनाला राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, दामोदर शर्मा, तात्यासाहेब मते, सुनील चोखारे, गजानन अहमदाबादकर, अरुण केदार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मंजुषा तिरपुडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याच्या समारोपावेळी उपस्थितांनी स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थ ‘जय विदर्भ, जय जय विदर्भ’ अशा घोषणा देत गावागावांत जनजागृती मोहीम राबविण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला.सिंदखेडराजातून झालेल्या या मेळाव्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top