Tejrao Tupkar :बुलढाणा जिल्ह्यातील गुंज येथील प्रगतिशील शेतकरी, शिक्षणप्रेमी व शैक्षणिक संस्थांचे संस्थापक तेजराव माणिकराव तुपकर (वय ७६) यांचे २४ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

गुंजच्या शैक्षणिक चळवळीचे शिल्पकार हरपले; तेजराव तुपकर यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन
साखरखेर्डा : बुलढाणा जिल्ह्यातील गुंज येथील प्रगतिशील शेतकरी, शिक्षणप्रेमी व शैक्षणिक संस्थांचे संस्थापक तेजराव माणिकराव तुपकर (वय ७६) यांचे २४ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.
गुंजसारख्या छोट्याशा गावात शेती व्यवसाय करत असतानाच तेजराव तुपकर यांनी प्रगतिशील शेतीची कास धरून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली. शेतीसोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. माजी शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे ते निकटवर्तीय व समर्थक म्हणून ओळखले जात होते.
डॉ. शिंगणे यांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागात शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी कै. भास्करराव शिंगणे विद्यालय, गुंज या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या विद्यालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाली, तर अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळाली. त्यानंतर सावखेड नागरे येथे श्रीमती प्रभावती काकू शिंगणे विद्यालय सुरू करून त्यांनी ग्रामीण शिक्षणाच्या प्रसारात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिक्षण, समाजकारण आणि शेती या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडल्याची भावना माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २४ जुलै रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, एक भाऊ तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून २७ जुलै रोजी कै. भास्करराव शिंगणे विद्यालय, गुंज येथे रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तेजराव तुपकर यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या रूपाने ग्रामीण शिक्षणाचा ध्यास घेतलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

