A beautiful confluence: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त साखरखेर्डा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात हजारो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यानंतर सर्व भाविकांना फराळाच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

साखरखेर्ड्यात आषाढी एकादशीला विठ्ठल नामाचा गजर; हजारो भाविकांनी घेतले दर्शन, महाप्रसादाचा लाभ
साखरखेर्डा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त साखरखेर्डा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात हजारो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यानंतर सर्व भाविकांना फराळाच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गावातील बेंदाडे घराण्याची विठ्ठलभक्तीची परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून अखंड सुरू आहे. लिंगायत (तेली) समाजातील हे घराणे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असून, मार्तंड अप्पा गुणाअप्पा बेंदाडे यांनी विरशैव धर्मीय असूनही भगवान पांडुरंगावरील अखंड श्रद्धेतून आपल्या निवासस्थानी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी केली. गावातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना पंढरपूरला जाता आले नाही तरी गावातच विठ्ठलाचे दर्शन व्हावे, या उदात्त हेतूने हे मंदिर उभारण्यात आले. श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती मोठे महाराज यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
विरशैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांमध्ये कोणताही भेदभाव नसून विठ्ठलाच्या चरणी सर्व मानवजात समान आहे, हा समतेचा संदेश या मंदिराच्या परंपरेतून आजही जपला जात आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सकाळी सहा वाजता सुधीर अप्पा बेंदाडे आणि शशिकांत अप्पा बेंदाडे या बंधूंनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर महाआरती संपन्न झाली आणि भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी बेंदाडे परिवारासह प्रफुल्ल जडे, अनिल कासार, गोपाल मानतकर, ललित अग्रवाल, महेंद्र पाटील, सोमेश्वर इंगळे, गोटू कासार, विश्वनाथ अप्पा जितकर, अरविंद बेंदाडे, सुनील रिंढे, अशोक अवचार, नितीन सोनुने यांच्यासह अनेक सेवाभावी नागरिकांनी महाप्रसादाचे आयोजन केले. हजारो भाविकांनी फराळाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरम्यान, स्थानिक एस.ई.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचा पालखी सोहळा काढून गावातील वातावरण विठ्ठलमय केले. तसेच श्री पलसिद्ध प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पालखी मिरवणुकीत सहभागी होत वारकरी परंपरेचा संस्कार जपला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे साखरखेर्डा परिसर दिवसभर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विरशैव आणि वैष्णव परंपरेतील समन्वय, सामाजिक ऐक्य आणि विठ्ठलभक्तीचा संदेश या सोहळ्यातून प्रभावीपणे अधोरेखित झाला.

