students won hearts : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीमती पद्माबाई जैन इंग्रजी प्राथमिक शाळा, आलेगाव येथे शनिवारी (दि. २५ जुलै) भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर “ज्ञानोबा माऊली तुकाराम… विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!” या नामगजराने दुमदुमून गेला.

आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी साकारली वारकरी परंपरा; भक्तिमय वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रम
पातूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीमती पद्माबाई जैन इंग्रजी प्राथमिक शाळा, आलेगाव येथे शनिवारी (दि. २५ जुलै) भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर “ज्ञानोबा माऊली तुकाराम… विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!” या नामगजराने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणातून पारंपरिक वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी आकर्षक वारी काढली. डोक्यावर टोप्या, गळ्यात तुळशीच्या माळा, हातात पताका घेऊन विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर भजन, अभंग आणि नामस्मरण करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी गोलाकार रिंगण घालत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले.
वारीनंतर विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्यांचा ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या अभंगांचे तसेच भारुडाचे प्रभावी सादरीकरण करून महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख करून दिली.
यावेळी मुख्याध्यापक अनंता धाईत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, भक्ती, संयम, समता आणि सामाजिक ऐक्याची मूल्ये बालपणापासून विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनीही आषाढी एकादशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले. चातुर्मासाचे आरोग्याशी असलेले नाते, ऋतूनुसार आहार-विहाराचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे सामाजिक मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनंता धाईत यांच्यासह कविता गिल्ले, नितेश तेलगोटे, संघपाल कांबळे, शेख सर, ज्ञानेश्वर भाकरे, अजिंक्य महानकर, सुवर्णा काळपांडे, आरती नालिंदे, प्रतिभा महल्ले, रजनी राऊत, प्रिती भाकरे, ज्ञानेश्वरी इंगळे, गायत्री खराटे, स्नेहा लाहोळे आणि अंकिता काठोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, पालक आणि उपस्थितांनीही या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.

