Khedekars absence : सिंदखेडराजा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेतील अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू असतानाच, साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणी कार्यक्रमाने नव्या राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दौऱ्यात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

ग्रामीण रुग्णालय पाहणीवरून राजकीय चर्चांना उधाण; खेडेकर डावलले की योगायोग?
अशोक इंगळे
साखरखेर्डा : सिंदखेडराजा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेतील अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू असतानाच, साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणी कार्यक्रमाने नव्या राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दौऱ्यात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
१९ जुलै रोजी साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता गोपाल मानतकर यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रतापराव जाधव यांनी अधिकाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. मात्र, या पाहणीवेळी डॉ. खेडेकर उपस्थित नसल्याचे छायाचित्रे आणि स्थानिक चर्चांमधून समोर आले.
यामुळे डॉ. खेडेकर यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले की हा केवळ कार्यक्रमातील योगायोग होता, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर काही स्थानिक पत्रकारांनाही पाहणी कार्यक्रमाची पूर्वकल्पना नसल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, सिंदखेडराजा मतदारसंघात शिंदे सेनेत दोन प्रभावी गट कार्यरत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन्ही गटांतील राजकीय हालचालींकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी साखरखेर्डा जिल्हा परिषद गटात जनसंपर्क वाढविल्याची चर्चा आहे. विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, महिला मेळावे, पाणीटंचाईच्या काळातील मदत आणि गावागावातील संपर्क मोहिमांमुळे त्यांची राजकीय उपस्थिती वाढताना दिसत आहे. दुसरीकडे, स्थानिक स्तरावर महेंद्र पाटील यांचे नावही संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत आहे. तसेच भाग्यश्री खेडेकर यांनीही या गटात सक्रियता वाढवल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून रविंद्र पाटील, काँग्रेसकडून शिवदास रिंढे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि इतर पक्षांकडूनही संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. या भागात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा प्रभाव कायम असल्याने त्यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीपासून निधी उपलब्ध होईपर्यंत विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी योगदान दिल्याचा दावा केला जातो. ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीसाठी तत्कालीन आरोग्यमंत्री म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर इमारतीसाठी निधी उपलब्ध करून बांधकाम पूर्ण करण्यासाठी डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पाठपुरावा केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. तसेच या कामासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ. खेडेकर यांनी यापूर्वी सार्वजनिकरीत्या नमूद केले होते.
सध्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी असली तरी त्याचे उद्घाटन आणि प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, पाहणी कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या राजकीय चर्चांमुळे मतदारसंघातील अंतर्गत समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

