Theft in laborers room :येथील नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीत वास्तव्यास असलेल्या मजुरांच्या खोलीत मध्यरात्री घरफोडी करून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गॅस सिलिंडरची भरलेली टाकी असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका संशयितासह एका अज्ञात साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

देऊळगाव राजा तहसील भवनात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; एक आरोपी निष्पन्न, दुसरा फरार
गजानन तिडके
देऊळगाव राजा : येथील नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीत वास्तव्यास असलेल्या मजुरांच्या खोलीत मध्यरात्री घरफोडी करून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गॅस सिलिंडरची भरलेली टाकी असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका संशयितासह एका अज्ञात साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश श्रीरंग साळुके (वय ३२, मूळ रा. रामेश्वर गल्ली, परतूर, जि. जालना, सध्या नवीन तहसील बिल्डिंग, देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून आफ्रोज शहा दिलावर शहा (रा. प्रतापनगर, देऊळगाव राजा) व त्याच्या एका अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ३३५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीतील मजुरांच्या राहण्याच्या खोलीच्या दरवाज्याच्या तारा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीतून भरलेली गॅस सिलिंडरची टाकी (३,००० रुपये), राजेंद्र कमला चौधरी यांच्या पँटच्या खिशातील २० हजार रुपयांची रोकड, विवो कंपनीचा मोबाईल, रेडमी C13 5G मोबाईल आणि ओप्पो A15S मोबाईल असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी २३ जुलै रोजी सकाळी ६.५१ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल बद्रीनारायण डिघोळे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहेत.
पोलिसांनी एका आरोपीची ओळख निष्पन्न केली असून, त्याच्या अज्ञात साथीदाराचा शोध सुरू आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी तसेच आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

