Maharashtra Bandh : दिल्लीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ व विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले आहे. ही घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली असल्याची माहिती पक्षाच्या निवेदनातून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार वंचित बहुजन आघाडी; महाराष्ट्र बंदसाठी समविचारी पक्षांना साद
बुलढाणा : दिल्लीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ व विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले आहे. ही घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली असल्याची माहिती पक्षाच्या निवेदनातून देण्यात आली आहे.
पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, विद्यार्थ्यांवरील कारवाई ही लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असून तिचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर शांततापूर्ण पद्धतीने बंद पाळत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना तसेच राज्यातील नागरिकांना २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच पक्षाच्या सर्व जिल्हा समित्या, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि फुले-शाहू-आंबेडकरी विद्वत सभांना तत्काळ समन्वय बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांशी संपर्क साधून बंदमध्ये व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या सूचनाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला कोणत्या राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा मिळणार, तसेच राज्यभर त्याचा कितपत परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

