Jan-Aakrosh Morcha: अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने सोमवारी देऊळगाव राजात ‘संविधानिक न्याय हक्क विराट जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हजारो महिला व मातंग समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आरक्षणातील अंतर्गत विषमता दूर करण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

‘संविधानिक न्याय हवा, उपवर्गीकरण तातडीने करा’; देऊळगाव राजात हजारोंचा मोर्चा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने सोमवारी देऊळगाव राजात ‘संविधानिक न्याय हक्क विराट जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हजारो महिला व मातंग समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आरक्षणातील अंतर्गत विषमता दूर करण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत हा मोर्चा बसस्थानक चौकात पोहोचला. तेथे सभेचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवरांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची आवश्यकता, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रतिनिधित्वावर आपली मते मांडली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीचे मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संतोष मुंडे यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात अनंत बदार समितीचा अहवाल शासनाला सादर झाला असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४१ अंतर्गत अनुसूचित जातींना देण्यात आलेले आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा लाभ सर्व घटकांना समान प्रमाणात मिळालेला नाही. शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाचे लाभ काही मोजक्या जातींपुरतेच मर्यादित राहिल्याने मातंग समाजासह अनेक वंचित घटक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करून आरक्षणाचा न्याय्य वाटा मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
वक्त्यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली. मात्र कालांतराने आरक्षणाच्या लाभाचे असमान वितरण झाल्यामुळे अनेक समाजघटकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ही विषमता दूर करण्यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोर्चात लहूजी शक्ती सेनाचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे, भारतीय वंचित जन संसदचे अध्यक्ष डॉ. अंबादास सगट, अण्णाभाऊ साठे क्रांतिसेनाचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे, क्रांतिगुरू लहूजी साळवे विकास परिषदचे संस्थापक उत्तमराव कांबळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फोरमचे संस्थापक विजय अंभोरे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री सर्जेराव जाधव, क्रांतीसेना अध्यक्ष राजेश घोडे, डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, लहूशस्त्र सेनेचे प्रमुख संजूबाबा गायकवाड, मातंग समाज प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष संजय इंचे, क्रांतिगुरू लहूजी साळवे विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि समाजबांधव सहभागी झाले होते. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

