Rain God takes a break : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या शेतमजुरांना बसत असून, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांचेही रोजगार थांबल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.

पावसाअभावी शेती ठप्प; शेतकरी संकटात, शेतमजुरांचे रोजगारही हिरावले
संजय तायडे
बोरगाव मंजू : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या शेतमजुरांना बसत असून, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांचेही रोजगार थांबल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्यानंतर डवरणी, निंदणी, खत व औषध फवारणी यांसारखी शेतीची कामे सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांनी ही कामे थांबविली आहेत. परिणामी शेतमजुरांच्या हाताला कामच उरलेले नाही. अनेक कुटुंबांपुढे रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यंत्रेही पडली बंद
शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे आधीच मजुरांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. कर्ज काढून ट्रॅक्टर आणि अन्य शेती यंत्रे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सध्या काम नसल्याने ही यंत्रेही शेतात उभी आहेत. त्यामुळे यंत्रमालक आणि मजूर अशा दोन्ही घटकांना आर्थिक फटका बसत आहे.
पिकांची वाढ खुंटली, दुबार पेरणीचे संकट
यंदा मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने खरीप पेरण्या उशिरा झाल्या. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या; मात्र अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उगवण कमी झाली. काही भागात दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पुन्हा पावसाने खंड दिल्याने दुबार पेरणी केलेली पिकेही संकटात सापडली आहेत.
पुरेशा ओलाव्याअभावी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांची वाढ थांबली असून पिके करपू लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेषतः मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
पावसाअभावी शेतीची सर्व कामे थांबल्याने शेतकरी, शेतमजूर, ट्रॅक्टरधारक आणि ग्रामीण बाजारपेठेतील व्यापारी अशा सर्व घटकांवर आर्थिक संकटाचे सावट निर्माण झाले आहे. आता संपूर्ण ग्रामीण भागाचे लक्ष वरुणराजाकडे लागले असून, लवकरच दमदार पाऊस झाल्यासच खरीप हंगाम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा मिळू शकणार आहे.

