Accelerate voter list: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या ऑनलाइन डिजिटायझेशनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कामातील दिरंगाईबाबत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या.

मतदार यादी पुनरावलोकनात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; सिंदखेडराजात बीएलओंना उपविभागीय अधिकाऱ्यांचा इशारा
अशोक इंगळे
सिंदखेडराजा : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या ऑनलाइन डिजिटायझेशनच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कामातील दिरंगाईबाबत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, संदीप बंगाळे, महसूल अधिकारी नागेश खरात, रामेश्वर कहाळे, गणेश देशमुख, संजय सोनुने, महसूल सहाय्यक तसेच महसूल विभागातील कर्मचारी व सेवक उपस्थित होते.
बैठकीत काही BLOंकडून मतदार यादी डिजिटायझेशनची प्रगती १० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे निदर्शनास आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवून दैनंदिन उद्दिष्टे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, ज्या BLOंची प्रगती समाधानकारक नसेल, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम १३४ तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मतदार यादी पुनरावलोकनाच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतदारांना सहकार्याचे आवाहन
मतदार यादीचे काम वेळेत आणि अचूक पूर्ण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत प्रा. संजय खडसे यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आपल्या क्षेत्रातील संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले. मतदारांनी आवश्यक ती अचूक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

