Navya Chaudhary: “झाडे लावा, झाडे जगवा” हा केवळ घोषवाक्य नसून काळाची गरज आहे, हे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या कु. नव्या नितीन चौधरी हिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. खेळण्याच्या वयातच तिने वृक्षारोपण आणि सीड बॉल्स (बीजगोळे) तयार करून पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून, तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दुसरीतील नव्याचा पर्यावरणासाठी अनोखा उपक्रम; सीड बॉल्स व वृक्षलागवडीने जिंकली मने
बुलढाणा : “झाडे लावा, झाडे जगवा” हा केवळ घोषवाक्य नसून काळाची गरज आहे, हे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या कु. नव्या नितीन चौधरी हिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. खेळण्याच्या वयातच तिने वृक्षारोपण आणि सीड बॉल्स (बीजगोळे) तयार करून पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून, तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मातीच्या गोळ्यांतून पर्यावरणाची पेरणी
उन्हाळ्यात विविध फळांच्या बिया गोळा करून नव्याने त्यांचे मातीचे बीजगोळे (सीड बॉल्स) तयार केले. हे बीजगोळे तिने शेताच्या बांधावर आणि मोकळ्या जागेत टाकून नैसर्गिक पद्धतीने वृक्षलागवडीचा प्रयत्न केला. याशिवाय तिने स्वतःच्या हस्ते आंबा, चिकू, सीताफळ आदी विविध फळझाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कुटुंबातून मिळाले पर्यावरणप्रेमाचे संस्कार
नव्या ही सुशिक्षित कुटुंबातील असून तिचे आजोबा सिताराम चौधरी यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. तिचे वडील प्रा. नितीन चौधरी हे शिक्षक असून आई सौ. निकिता चौधरी यांनीही लहानपणापासून पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले. कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांमुळेच नव्याने पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम हाती घेतल्याचे दिसून येते.
वनविभागातील काकांकडून मिळाली प्रेरणा
नव्याचे काका सचिन चौधरी हे वनविभागात आर.एफ.ओ. (Range Forest Officer) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून नव्याला निसर्ग, वृक्ष आणि वनसंवर्धनाची आवड निर्माण झाली. पालक आणि कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे तिचा हा छंद अधिक जोपासला गेला.
वनविभागाकडूनही कौतुक
लहान वयात पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या या उपक्रमाची दखल वनविभागानेही घेतली आहे. वनविभागाचे अधिकारी राजेंद्र शेळके यांनी नव्याच्या कार्याचे कौतुक करून तिचे अभिनंदन केले. आजच्या डिजिटल युगात बहुतांश मुले मोबाईल आणि दूरदर्शनमध्ये रमलेली असताना नव्याने वृक्षसंवर्धनाचा घेतलेला वसा इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
नव्या चौधरी हिच्या या उपक्रमाबद्दल सिंदखेड राजा परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पर्यावरण संरक्षणासाठी लहान वयातही मोठे योगदान देता येते, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

