Gram Sabha passes : साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० मधील १ हेक्टर ६२ आर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याचा एकमुखी ठराव गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे गावातील युवक, खेळाडू आणि नागरिकांनी स्वागत करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

साखरखेर्डा ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय; सरकारी जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्यास हिरवा कंदील
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील गट क्रमांक ८७० मधील १ हेक्टर ६२ आर सरकारी जमीन क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याचा एकमुखी ठराव गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे गावातील युवक, खेळाडू आणि नागरिकांनी स्वागत करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
गट क्रमांक ८७० मधील ही जमीन शासनाच्या मालकीची असून या ठिकाणी अनेक वर्षांपासून गावाचे क्रीडांगण आहे. ही जागा भविष्यातही युवकांच्या खेळासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यासाठी कायम राखीव ठेवावी, अशी मागणी ग्रामसभेत मांडण्यात आली. या प्रस्तावाला उपस्थित नागरिकांनी एकमुखी पाठिंबा दिला.
सुमारे दहा दिवसांपूर्वी या जागेवर अतिक्रमणाच्या उद्देशाने नांगरणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी शेकडो युवकांनी त्यास तीव्र विरोध दर्शविल्याने गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदार अजित दिवटे आणि ठाणेदार युवराज रबडे यांनी मध्यस्थी करत संबंधित जागेवर ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे तसेच जमीन सपाटीकरण करण्याचे आदेश दिले होते.
ही जमीन पूर्वी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात होती. संबंधित जमीन शासनाच्या नावे करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानंतर संबंधित जमीन शासनाच्या नावे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही व्यक्तींनी ही जागा त्यांच्या मालकीची असल्याचा दावा करत ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले.
गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने ही जमीन शासनाच्या नावे कायम ठेवून मुलांसाठी क्रीडांगण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्याचे ठिकाण म्हणून राखीव ठेवण्याचा ठराव मांडला. या ठरावाला बहुसंख्य नागरिकांनी पाठिंबा दिला.
यावेळी गोपाल राजपूत यांनी संबंधित जमीन साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीच्या नावे असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगत, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर ती क्रीडांगणासाठी राखीव ठेवावी; मात्र मालकी संस्थेच्या नावेच राहावी, असे मत मांडले. मात्र उपस्थित नागरिकांनी या मताला विरोध करत जमीन शासनाच्या नावेच कायम ठेवून ती क्रीडांगणासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय सरपंच ज्योती अमित जाधव होत्या. यावेळी माजी सरपंच पुनम महेंद्र पाटील, सुमनताई जगताप, कमलाकर गवई, दाऊद कुरेशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, उल्हास देशपांडे, सय्यद रफीक, शेख युनुस, इब्राहिम शहा, चंद्रशेखर शुक्ल, सुनील जगताप, माजी सभापती राजू ठोके, रामदाससिंग राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, दिलीप खंडारे, संग्रामसिंह राजपूत यांच्यासह शेकडो क्रीडाप्रेमी युवक उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज मोरे यांनी, तर सूत्रसंचालन अरुण देशमुख यांनी केले.
ग्रामसभा संपल्यानंतर युवक व खेळाडूंनी साखरखेर्डा बसस्थानक परिसरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. “जमीन नाही कुणा बापाची, ती आहे सरकारची” आणि “क्रीडांगण झालेच पाहिजे” अशा घोषणा देत त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

