A unique example : आरोग्य विभागात तब्बल ४० वर्षे औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत राहून रुग्णसेवेचा आदर्श घालणारे गोपाल मानतकर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सेवापूर्तीनिमित्त कोणताही औपचारिक सत्कार समारंभ न करता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांनी १९ जुलै रोजी भव्य रोगनिदान व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर श्री पलसिद्ध महास्वामी मठ, साखरखेर्डा येथे होणार असून परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाल मामा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सेवानिवृत्तीनंतरही सेवाभाव कायम; साखरखेर्ड्यात बहुविशेषज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर
साखरखेर्डा : आरोग्य विभागात तब्बल ४० वर्षे औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत राहून रुग्णसेवेचा आदर्श घालणारे गोपाल मानतकर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सेवापूर्तीनिमित्त कोणताही औपचारिक सत्कार समारंभ न करता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांनी १९ जुलै रोजी भव्य रोगनिदान व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर श्री पलसिद्ध महास्वामी मठ, साखरखेर्डा येथे होणार असून परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाल मामा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
गोपाल मानतकर यांनी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षे औषध निर्माण अधिकारी म्हणून सेवा बजावताना रुग्णांना वेळेवर औषधे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ३०० ते ३५० रुग्णांची ओपीडी होत असतानाही त्यांनी प्रत्येक रुग्णाशी आत्मीयतेने वागून सेवाभाव जपला. दिवंगत डॉ. सुखदेव मानतकर यांचा सेवेचा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून पुढे नेला.
१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवापूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून समाजासाठी काहीतरी उपयुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या उपक्रमासाठी भूमिपुत्र वैद्यकीय मदतकक्ष, बुलढाणा तसेच केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार यांचे सहकार्य लाभले आहे.
शिबिरात मेडिसीन व छाती विकार, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदयरोग, मेंदू विकार, मूत्रपिंड विकार, दंतरोग, यकृत व पोटविकार, शस्त्रक्रिया तसेच कर्करोग या विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यक औषधोपचार व मार्गदर्शनही केले जाणार आहे.
शिबिराचे उद्घाटन माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आयुष राज्यमंत्री तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव राहणार आहेत.
यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजीमंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर तसेच अनिल नावंदर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सेवापूर्तीचा आनंद समाजसेवेतून साजरा करण्याचा हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

