Nandura Railway Station: भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपयांच्या खर्चातून सर्वांगीण पुनर्विकास पूर्ण झाला असून, हे आधुनिक स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे.

नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; आधुनिक सुविधांनी सजलेले स्थानक प्रवाशांच्या सेवेत
बुलढाणा : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपयांच्या खर्चातून सर्वांगीण पुनर्विकास पूर्ण झाला असून, हे आधुनिक स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे.
हावडा–नागपूर–मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे प्रवेशद्वार मानले जाते. या स्थानकावरून दररोज सुमारे ४,५४५ प्रवासी प्रवास करतात, तर ३६ रेल्वेगाड्यांची ये-जा होते. प्रवासी वाहतुकीबरोबरच कृषी आणि औद्योगिक मालवाहतुकीसाठीही या स्थानकाचे विशेष महत्त्व आहे.

आधुनिक सुविधांनी सज्ज स्थानक
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. नव्या स्थानक इमारतीसह प्रशस्त आरक्षण कार्यालय, चार आरक्षण कक्ष, वातानुकूलित प्रतीक्षालय, पुरुष, महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, नवीन प्रवेशद्वार, वाहनतळ, संरक्षक भिंत, आधुनिक प्रकाशयोजना, व्हिट्रिफाइड फरशी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टिकाऊ आसनव्यवस्था आणि दृष्टीहीनांसाठी मार्गदर्शक पट्ट्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच फलाट क्रमांक १ वर १६० मीटर आणि फलाट क्रमांक २ वर २२४ मीटर लांबीचे नवीन शेड उभारण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अडथळामुक्त प्रवेश, कमी उंचीचे आरक्षण कक्ष, विशेष स्वच्छतागृहे, राखीव वाहनतळ आणि आधुनिक दिशादर्शक फलक यामुळे स्थानक अधिक प्रवासी-अनुकूल बनले आहे.
कृषी, उद्योग आणि पर्यटनाला चालना
नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे कृषी केंद्र असून येथून गहू, सोयाबीन, कांदा आणि कापूस यांची मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गे वाहतूक केली जाते. याशिवाय तेल गिरण्या, डाळ प्रक्रिया उद्योग तसेच नांदुरा खवा यांसारख्या स्थानिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठीही हे स्थानक महत्त्वाची भूमिका बजावते.
पर्यटनाच्या दृष्टीनेही या स्थानकाचे महत्त्व वाढणार आहे. १०५ फूट उंच हनुमान मूर्ती, अंबादेवीगड, ज्ञानगंगा नदी परिसर, शेगाव, ज्ञानगंगा अभयारण्य आणि लोणार विवर या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी नांदुरा स्थानक अधिक सोयीचे ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, या पुनर्विकासामुळे प्रवाशांच्या सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि दिव्यांगांसाठी सुलभता वाढणार असून स्थानिक व्यापार, उद्योग आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
दरम्यान, महाराष्ट्रातील अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत निवडलेल्या १५ स्थानकांपैकी सावदा, धुळे, देवळाली, मूर्तिजापूर आणि लासलगाव ही स्थानके यापूर्वी राष्ट्राला समर्पित करण्यात आली असून, आता नांदुरा रेल्वे स्थानकाचाही या यादीत समावेश होणार आहे.

