Bizarre theft : डोणगाव येथील लोणी गवळी रोडवरील बोर तलाव परिसरात चोरट्यांनी विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा कापून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र, घटना उघडकीस येऊनही महावितरणकडून अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महावितरणच्या तारांवर चोरट्यांचा डल्ला; आठ खांबांवरील तारा चोरी, वीजपुरवठा खंडित
डोणगाव : डोणगाव येथील लोणी गवळी रोडवरील बोर तलाव परिसरात चोरट्यांनी विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा कापून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र, घटना उघडकीस येऊनही महावितरणकडून अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी भगवान बाजड यांच्या शेतालगत असलेल्या विजेच्या लाईनला चोरट्यांनी लक्ष्य केले. १२ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ विजेच्या खांबांवरील शेकडो मीटर लांबीच्या ॲल्युमिनियमच्या तारा कापून लंपास केल्या. चोरी झालेल्या तारांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
तारा चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. वीजपुरवठा दीर्घकाळ सुरू न झाल्याने भगवान बाजड यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता तारा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून, शेतीची कामेही प्रभावित झाली आहेत.
विशेष म्हणजे, सरकारी मालमत्तेची एवढी मोठी चोरी होऊनही महावितरणकडून अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात तक्रार दाखल करण्यास विलंब का होत आहे, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत.
स्थानिकांच्या मते, चालू विद्युत वाहिन्यांवरील तारा कापून नेणे हे अत्यंत धोकादायक काम असून, यामागे सराईत चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, याच परिसरात यापूर्वीही रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरीला गेल्याची घटना घडली होती. तसेच २७ जून रोजी भगवान बाजड यांच्या शेतातून पेरणीसाठी ठेवलेले सोयाबीन बियाणे व लोखंडी बाजही अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या नव्या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करावा, पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी करीत आहेत.

