Block Education Officer : पंचायत समिती, देऊळगाव राजा येथील नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी सोमवारी (दि. १३ जुलै) सकाळी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा, भिवगाव बु. येथे आकस्मिक भेट देत शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, पोषण आहार, स्वच्छता आणि विविध शैक्षणिक सुविधांची सविस्तर पाहणी केली.

विद्यार्थ्यांशी थेट संवाद, शाळेच्या कामकाजाचा घेतला आढावा; श्रीकृष्ण सपकाळ यांचे मार्गदर्शन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : पंचायत समिती, देऊळगाव राजा येथील नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी सोमवारी (दि. १३ जुलै) सकाळी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा, भिवगाव बु. येथे आकस्मिक भेट देत शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, पोषण आहार, स्वच्छता आणि विविध शैक्षणिक सुविधांची सविस्तर पाहणी केली.
भेटीदरम्यान त्यांनी शालेय पोषण आहाराची तपासणी करून विद्यार्थ्यांसोबत पोषण आहाराचा आस्वाद घेतला. तसेच शाळेचा परिसर, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची पाहणी करून स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी कविता म्हणवून घेतली, इंग्रजी शब्दलेखन व इतर शैक्षणिक उपक्रमांची चाचपणी केली. तसेच इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांशी शैक्षणिक विषयांवर चर्चा करून त्यांच्या अध्ययन प्रगतीचा आढावा घेतला.
विशेष म्हणजे, इयत्ता सहावी ते आठवीतील मुलींशी स्वतंत्र संवाद साधून त्यांच्या सुरक्षेसाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली आणि आवश्यक सूचना केल्या.
याशिवाय शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कार्यरत व मंजूर शिक्षकांची संख्या, रिक्त पदांची स्थिती आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन वर्गांचे नियोजन करून ते नियमित सुरू करण्याच्या सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या.
यानंतर सर्व शिक्षकांसोबत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करत गुणवत्ता वृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. भेटीच्या शेवटी शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील स्वच्छ, सुबक परिसर आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

