Intermittent rain delays sowing: सिंदखेडराजा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, सातही मंडळांत समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली असली, तरी आतापर्यंत फक्त रिपरिप स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने पेरणीच्या कामावर परिणाम झाला आहे. ७ जुलैपर्यंत तालुक्यात केवळ १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाचा जुगार शेतकऱ्यांच्या माथी; सिंदखेडराजात अजूनही दमदार सरींची प्रतीक्षा
अशोक इंगळे
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून, सातही मंडळांत समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली असली, तरी आतापर्यंत फक्त रिपरिप स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने पेरणीच्या कामावर परिणाम झाला आहे. ७ जुलैपर्यंत तालुक्यात केवळ १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र, हा पाऊस दररोज रिमझिम किंवा रिपरिप स्वरूपातच पडत राहिल्याने शेतात पाणी साचले नाही, तसेच नदी-नालेही वाहू शकले नाहीत. विहिरींच्या पाणीपातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. पाऊस दररोज होत असला, तरी दमदार स्वरूपाचा नसल्याने खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या हलक्या पावसावरच पेरणीचा निर्णय घेतला. ३० जूनपर्यंत सुमारे ५० टक्के पेरणी पूर्ण झाली होती; मात्र उर्वरित शेतकऱ्यांना पाऊस थांबण्याची आणि जमीन मशागतीयोग्य होण्याची प्रतीक्षा करावी लागली. एकीकडे पाऊस सुरूच राहिला, तर दुसरीकडे दमदार सरी न आल्याने पेरणीचे काम अनेक ठिकाणी रखडले.
तालुक्यात यंदा सोयाबीनचे ३५ हजार हेक्टर, कपाशीचे २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय हळद २ हजार हेक्टर, तूर ५ हजार हेक्टर, मूग ५०० हेक्टर, उडीद ५०० हेक्टर, संकरित ज्वारी ५०० हेक्टर, मका ५०० हेक्टर तसेच इतर भाजीपाला व पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. या सर्व पिकांचे भवितव्य आता पुढील पावसावरच अवलंबून आहे.
तालुक्यातील मंडळनिहाय पर्जन्यमानातही मोठी तफावत दिसून येत आहे. सिंदखेडराजा मंडळात १८५.०९ मिमी, किनगाव राजा १५९.०९ मिमी, मलकापूर पांग्रा २२६.०६ मिमी, दुसरबीड १६४.०८ मिमी, सोनोशी १४३.०१ मिमी, शेंदुर्जन २०८.०१ मिमी आणि साखरखेर्डा १५९.०१ मिमी पावसाची नोंद जून ते ७ जुलैदरम्यान झाली आहे. मात्र, या नोंदी असूनही बहुतांश भागात पावसाचा जोर अपुरा असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.
सध्या नदी-नाले खळखळून वाहिलेले नाहीत, विहिरींमध्ये पुरेसे पाणी साठलेले नाही आणि जमिनीतही पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरोशावर लागवडीचा जुगार खेळला आहे. परंतु हा जुगार अनेकदा तोट्यातच जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. आता जुलै महिन्यात दमदार पाऊस पडतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

