Mahabreaking

[breaking_news]

  Cinematic chase :सिनेस्टाईल पाठलाग, गणपूर शिवारात कार अडवली; धारदार शस्त्रांसह दोघे ताब्यात

Cinematic chase : गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत सिनेस्टाईल पाठलाग करून मेहकर पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले. या कारवाईत धारदार शस्त्रे, मोबाईल आणि एक कार असा २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडलेल्या आरोपींपैकी अमोल परात्या भोसले हा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेला कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Cinematic chase

मेहकर पोलिसांची धडक कारवाई; मोक्का गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारांसह दोघे जेरबंद

मेहकर  : गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत सिनेस्टाईल पाठलाग करून मेहकर पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले. या कारवाईत धारदार शस्त्रे, मोबाईल आणि एक कार असा २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडलेल्या आरोपींपैकी अमोल परात्या भोसले हा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेला कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (६ जुलै) पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रिसोड–सोनाटी रोडवरून मेहकर बायपासमार्गे मेहकर शहराकडे येणाऱ्या लाल रंगाच्या Datsun Redi-Go (क्र. MH-31-FA-5820) या कारमध्ये काही रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार प्रवास करत आहेत. या खात्रीशीर माहितीनंतर पोलीस निरीक्षक आलेवार यांनी तात्काळ पथकासह संबंधित मार्गावर नाकाबंदी केली.

थोड्याच वेळात संशयित वाहन पोलिसांना दिसले. गाडीच्या मागील काचेवर ‘जगदंब’ असे लिहिलेले होते. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला; मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने बायपासमार्गे सारंगपूर–बरटाळा फाट्याकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. अखेर गणपूर फाटा, गणपूर शिवार (ता. मेहकर) येथे पोलिसांनी शिताफीने ही कार अडवली.

कार थांबताच त्यातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक जण पसार होण्यात यशस्वी झाला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून अमोल परात्या भोसले (वय २५, रा. वरटाळा, ता. मेहकर) आणि अजय दहीमल भोसले (वय २६, रा. वरदडा-लोणी लव्हाळा, ता. मेहकर) या दोघांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यातून तीन धारदार सुरे, एक ऑटोमॅटिक चाकू, रेडमी नोट 13 5G मोबाईल आणि संशयित कार असा एकूण २,६६,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस तपासात अमोल भोसले हा गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध मेहकर, खामगाव ग्रामीण, लोहा (नांदेड), अहमदपूर (लातूर) आणि सिसोड (वाशीम) या विविध पोलीस ठाण्यांत खूनप्रयत्न, दरोडा, शस्त्रबंदी आणि मालमत्तेविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी परतापूर, उकळी आणि सुकळी परिसरात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनही राबविले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात अप.क्र. ४५७/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप विरांजे, सपोनि प्रदीपकुमार राठोड, पोउपनि किरण खाडे, एएसआय सुखदेव गव्हाणे तसेच मेहकर पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top