Borgaon Manju taluka: प्रशासकीय सुलभता, महसुली कामांची गती आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बोरगाव मंजूला नव्याने तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी बोरगाव मंजू तालुका कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. या मागणीसाठी गेल्या दोन दशकांपासून सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत असतानाही अद्याप न्याय मिळालेला नसल्याने आता तालुका निर्मितीसाठी एल्गार पुकारण्यात आला आहे.

७२ गावांसाठी बोरगाव मंजू ठरते मध्यवर्ती केंद्र; तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोरात
बोरगाव मंजू : प्रशासकीय सुलभता, महसुली कामांची गती आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बोरगाव मंजूला नव्याने तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी बोरगाव मंजू तालुका कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. या मागणीसाठी गेल्या दोन दशकांपासून सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत असतानाही अद्याप न्याय मिळालेला नसल्याने आता तालुका निर्मितीसाठी एल्गार पुकारण्यात आला आहे.

स्थानिक सोपीनाथ महाराज मंदिर येथील सभागृहात रविवारी, ५ जुलै रोजी सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासनाने तातडीने दखल घेऊन बोरगाव मंजू तालुका घोषित करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष जनगणना, भौगोलिक स्थिती, सीमांकन आणि नागरिकांना शासकीय सेवा सुलभतेने मिळण्याच्या दृष्टीने बोरगाव मंजू तालुक्याची निर्मिती अत्यावश्यक आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, वृद्ध नागरिक यांची महसुली व इतर शासकीय कामे जलदगतीने निकाली निघावीत, यासाठी तालुका निर्मितीची अंमलबजावणी त्वरित करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी जनजागृती अभियानही राबविण्यात येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. शहराची लोकसंख्या सुमारे २७ हजार असून येथे संमिश्र लोकवस्ती आहे. बहुतांश नागरिक शेतकरी व शेतमजूर वर्गातील आहेत. बोरगाव मंजू येथे शाळा, महाविद्यालय, पोलिस ठाणे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय, महसूल मंडळ कार्यालय, ग्राम सचिवालय, पाटबंधारे विभागाचे कार्यालय, बँका, रेल्वे स्थानक तसेच मध्यवर्ती एसटी बसथांबा अशा अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
याशिवाय, जिल्हा ठिकाणी जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७२ गावे समाविष्ट आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि व्यापारी यांच्यासाठी बोरगाव मंजू हे मुख्य बाजारपेठ व प्रशासकीयदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण ठरते. या सर्व बाबींचा विचार करता बोरगाव मंजूला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देणे गरजेचे असल्याचे बैठकीत ठामपणे मांडण्यात आले.
तालुका निर्मितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली कामे, दाखले, प्रमाणपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे व इतर शासकीय सेवा मिळविण्यास मोठी सोय होणार आहे. तसेच वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची बचत होऊन सर्वसामान्यांची कामे अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत, आता आंदोलनाचा इशाराही कृती समितीने दिला आहे. बोरगाव मंजूसह ग्रामीण भागातील नागरिकांची ही गेल्या दोन दशकांपासूनची रास्त मागणी असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीतून करण्यात आली. या बैठकीस बोरगाव मंजूसह परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

